पुणे

लोणावळा : द्रुतगतीवर विचित्र अपघात; एक ठार, दोन जण जखमी

अमृता चौगुले

लोणावळा; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील खोपोली हद्दीत फुडमॉलजवळील तीव्र उतारावर एका ट्रेलरची चार वाहनांना धडक बसल्याने झालेल्या या अपघातात दोन ट्रक दरीत सुमारे शंभर फूट उंचीवरून खाली पडले. या विचित्र अपघातात ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला, तर इतर दोन जण जखमी झाले. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. हा अपघात बुधवारी पहाटे चारच्या सुमारास झाला. अजित जाधव (वय 32, रा. सांगली) अपघातात मृत्यू झालेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे.

दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या टेलरचा (क्रमांक- एमएच-46/बीएम-9397) टायर फुटल्याने ट्रेलर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलरने पुढे जाणार्‍या टेम्पोला (क्रमांक- एमएच-13/ डीक्यू-3101) पहिली धडक दिली. नंतर डाव्या बाजूने जाणार्‍या ट्रकला क्रमांक- केए3-9/ए-0344) धडक दिली. त्यानंतर पुढे आणखी एका ट्रकला (क्रमांक- केए-51/एजे-5978) धडकला. या विचित्र अपघातात एका ट्रकची केबीन सुटून तो ट्रक आणि दुसरा एक ट्रक मार्गालगतच्या दरीत कोसळला. यामध्ये दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्ग व खोपोली पोलिसांसह देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत ट्रकच्या केबीनमध्ये अडकलेल्या एका जखमी चालकाला बाहेर काढले. त्याला उपचारासाठी तत्काळ पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने मार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलिस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT