Abhay Scheme new deadline
पुणे: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दोन वर्षांपूर्वी राबविलेल्या अभय योजनेला पुन्हा 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामध्ये ज्यांनी यापूर्वी अर्ज केले होते, मात्र, रक्कम भरली नव्हती अशांनाच याचा लाभ घेता येणार आहे. शहरातील 250 जणांना 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देऊन मुद्रांक शुल्क भरण्याचे आवाहन सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या मुद्रांक आणि नोंदणी विभागाने ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 मार्च 2024 या दोन टप्प्यांत योजना राबविली होती. त्यात 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या काळात नोंदविण्यात आलेल्या दस्तांमध्ये चुकीचे मुद्रांक शुल्क भरण्याबाबत तसेच दंडाबाबत सवलत दिली होती. (Latest Pune News)
त्यानुसार राज्यात 81 हजार 809 अर्ज आले होते. त्यापैकी 41 हजार 85 प्रकरणात मुद्रांक शुल्क तसेच दंडातून 509 कोटी 61 लाख 88 हजार 264 रुपये रक्कम प्राप्त झाली आहे. उर्वरित 13 हजार 566 प्रकरणांमध्ये अर्जदारांनी मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरली नाही. अशा पक्षकारांना आता ही रक्कम भरण्यास 20 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. आतापर्यंत 35 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून उर्वरित अर्जांमधून सुमारे दोन ते अडीच कोटी महसूल मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे हिंगाणे म्हणाले.