पुणे : पोलिसांकडून कुख्यात बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीला खाक्या दाखवताच फरार झालेल्या कृष्णा आंदेकर मंगळवारी (दि.16) सकाळी समर्थ पोलिसांना शरण आला. त्यामुळे बंडू आंदेकर टोळीचे प्रमुख चेहरे असलेले सर्वच जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. तब्बल अकरा दिवस कृष्णा कोठे फरार झाला होता, त्याला फरार कालावधीत कोणी मदत केली, याचा पोलिस शोध घेत आहेत. पुढील तपासासाठी समर्थ पोलिसांनी त्याला गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. (Latest Pune News)
माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुष कोमकर याचा (दि. 5) खून केला होता. या प्रकरणात बंडू आंदेकरसह टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मात्र कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय 40) हा पसार झाला होता. दि. 5 सप्टेंबर रोजी आयुषचा लहान भाऊ ए. डी. कॅम्प परिसरात खासगी क्लाससाठी गेला होता. त्याला घेण्यासाठी आयुष कोमकर गेला होता. क्लासवरून आल्यानंतर घराच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करत असताना आयुषवर निर्घृणपणे गोळ्या झाडून आंदेकर टोळीने खून केला होता, तेव्हापासून कृष्णा आंदेकर हा पसार झाला होता. त्याचा शोध घेत असतानाच तो शरण आल्याने संपूर्ण महत्त्वाचे चेहरे असलेली आंदेकर टोळीच गजाआड झाली आहे.
सोमवारी अटक करण्यात आलेल्या बंडू आंदेकर टोळीच्या 12 जणांना पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर बंडू आंदेकर याने न्यायालयात आपले म्हणणे सादर केले होते. त्यामध्ये त्याने ‘कृष्णा आंदेकर याची माहिती दे, नाही तर त्याला थेट गोळ्या झाडू’, अशी धमकी दिल्याचा दावा बंडू आंदेकर याने केला होता. मात्र तपास अधिकार्यांनी न्यायालयासमोर आरोपीने केलेले सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, ‘कृष्णाची माहिती दे नाहीतर गोळ्या झाडू’ ही बातमी वार्यासारखी सर्वत्र पसरली. याची खबर कृष्णा आंदेकर याला लागल्यानंतरच पोलिसांना घाबरून तो समर्थ पोलिसांसमोर हजर झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती.
कृष्णा आंदेकर हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याच्याच सांगण्यावरून दत्ता काळे याने आंबेगाव पठार परिसरात सोमनाथ गायकवाड याच्या घराची रेकी केली. दरम्यानच्या कालावधीत काळे हा कृष्णाच्या संपर्कात होता. त्यानेच काळेला पाच हजार रुपये खोली भाडेतत्त्वावर घेण्यासाठी दिले होते. आयुषवर गोळ्या झाडणारा अमन पठाण हा एक मुख्य आरोपी आहे. कृष्णाच्या संभाषणात अमनला पाठवून देतो असे काळेला सांगितले होते. दुसर्या दिवशी कृष्णा याने कॉल न केल्यामुळे काळे याने यश पाटील याला कॉल केला. त्यावेळी त्याने देखील अमन याचे नाव घेतले होते. कृष्णा याने अमनचा वारंवार उल्लेख केला आहे. तसेच कृष्णाने पाच पिस्तूल पाठवून दिल्याचे देखील त्या दाखल गुन्ह्यात म्हटले होते. त्यानंतर पुढील चार ते पाच दिवसांत आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. कृष्णा आंदेकर हा आरोपींवर रेकीतील मास्टर माईंड असल्याचे पहिला प्लॅन फसल्यानंतर समोर आले होते. त्यानंतर आयुषचा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.