पुणे; पुढारी वृत्तसेवा: प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाचे चौघांनी राहत्या घरातून अपहरण केले. त्यानंतर आंबेगाव परिसरातील एका होस्टेलमध्ये डांबून ठेवून कोयत्याने, पट्ट्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. मारहाणीत अपह्रत तरुणाच्या हाताचा पंजा तुटलेला पाहून आरोपींनी त्याचा मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला होता. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह तिघांना बेड्या ठोकल्या असून, एका अल्पवयीन मुलालादेखील ताब्यात घेतले आहे.
शुभम विलास पवार (वय 26, रा. लिपाणी वस्ती, दत्तनगर, जांभूळवाडी रोड), प्रथमेश महादेव येनपुरे (वय 23), यशराज शिवप्रसाद मिसाळ (वय18, राहणार दोघे काचेआळी, रविवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील येनपुरे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर दरोडा व आर्म अॅक्टचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत 32 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.
पवार याची बहीण 8 सप्टेंबर रोजी घरातून निघून गेली होती. फिर्यादी तरुण व त्याची बहीण पूर्वी एका ठिकाणी काम करीत होते. त्यामुळे शुभम याला त्याची बहीण फिर्यादीसोबत गेली असल्याचा संशय होता. त्याच कारणातून 11 सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता फिर्यादीचे वारजे परिसरातील राहते घरातून तिघांनी अपहरण केले. त्यानंतर त्याला जांभूळवाडी व आंबेगाव बुद्रुक येथील एका होस्टेलवर आणून ठेवले. तेथे शुभम व त्याच्या तिघा मित्रांनी फिर्यादी तरुणाला कोयता व पट्ट्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत फिर्यादीच्या हाताचा अर्धा पंजा तुटला. हा प्रकार पाहून चौघा आरोपींनी तेथून तरुणाचा मोबाईल घेऊन पळ काढला.
याबाबत चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, कर्मचारी हनुमंत मासाळ, अमोल राऊत, अजय कामठ यांनी चौघांना कात्रज तिरंगा चौकात सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, कर्मचारी प्रदीप शेलार, विजय भुरूक, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी यांच्या पथकाने केली.