पुणे: भरधाव कार उलटून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई- बंगळुरू बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ झाला. अपघातात कारमधील सात जण जखमी झाले. विजया बाजीराव पडवळ (वय 29, रा. शेळू, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात पवन कहाते, विजय आंबेकर, सचिन मंजाबापू, गायत्री मोहिते, सुप्रिया लाड, संदीप मराठे जखमी झाले आहेत.
भरधाव कार चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी कारचालक प्रसाद दिलीप ढोले (वय 25, रा. सावरदरी, ता खेड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातात कारचालक ढोले जखमी झाला आहे. पोलीस शिपाई प्रशांत चाटे यांनी याबाबत सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव कार सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून निघाली होती. नर्हे परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. कार उलटल्याने कारचालक प्रसाद याच्यासह कारमधील प्रवासी विजया, पवन, विजय, सचिन, गायत्री, सुप्रिया, संदीप गंभीर जखमी झाले.