पुणे

पिंपरी : मारहाणीत एका तरूणाचा मृत्यू; किरकोळ कारणावरून झाला होता वाद

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: किरकोळ वादातून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 9) रात्री आकुर्डी येथे घडली.
मोहन बन्सराज प्रसाद गौतम (35, रा. आकुर्डी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जगतपाल बाबू शेट्टी (58, रा. पंचतारा नगर, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश पिराजी खाडे (32, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन हे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास किरण ज्वेलर्स समोरील इलेक्ट्रिक पोलजवळ बसले होते. त्यावेळी मोहन आणि आरोपी महेश यांच्यात किरकोळ वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. महेश याने मोहन यांच्या डोक्यात जोरात लाथ मारल्याने त्यांचे डोके इलेक्ट्रिक पोलला धडकले. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT