दीपेश सुराणा
पिंपरी : लग्न होऊन वर्ष उलटल्यानंतरही विवाह नोंदणी न करणार्यांचे प्रमाण जास्त आढळत आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्या 90 दिवसांमध्ये विवाह नोंदणी करून घेणार्यांचे प्रमाण हे सरासरी 60 टक्के इतके आहे. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीत आणखी 20 टक्के जण नोंदणी करून घेतात. मात्र, जवळपास 20 टक्के दांपत्य हे वर्ष उलटल्यानंतर नोंदणी करत असल्याचे आढळले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका जोडप्याने पासपोर्ट काढण्यासाठी तब्बल 20 वर्षानंतर विवाह नोंदणी करून घेतली.
सध्या लगीनसराई सुरू आहे. मात्र, एकदा विवाह सोहळा पार पडला की अनेक दांपत्य हे आपल्या नोकरी-व्यवसायामध्ये गुंतून जातात. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयात जाऊन नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. मात्र, विविध कारणांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र गरजेचे असल्याने विवाह नोंदणी करून घ्यायला हवी, असे अधिकार्यांनी सांगितले.
विवाहानंतर पहिल्या तीन महिन्यांमध्ये जोडप्यांनी विवाह नोंदणी करून घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी अर्जदार पती-पत्नी दोघांनाही विवाह नोंदणी कार्यालयामध्ये हजर राहावे लागते. मुदत संपल्यानंतरही विवाह नोंदणी करता येत असल्याने बरीच जोडपी उशिरा विवाह नोंदणी करत असल्याचे समोर आले आहे. अनेकांच्या घरी बाळाचे आगमन झाले, तरी ते विवाह नोंदणी करत नसल्याचे आढळले आहे.
नोंदणीची प्रक्रिया काय?
विवाह नोंदणीसाठी नागरी सुविधा केंद्रात ऑनलाइन अर्ज करून शुल्क भरावे लागते. त्यानंतर अर्ज व विवाह नोंदणी कागदपत्रे जवळच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जमा करावी लागतात. या कागदपत्रांची तपासणी केली जाते. त्यानंतर नोंदणीसाठी जोडप्यांना तारीख दिली जाते. सध्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मंगळवार आणि शुक्रवार अशा दोन दिवशी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्या दिवशी विवाह नोंदणीसाठी उपनिबंधक म्हणून नियुक्त महापालिका रुग्णालयांतील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतात. त्यांच्या स्वाक्षरीने विवाह नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.
'ब' क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक नोंदणी
गेल्या़ दोन वर्षांमध्ये 8 हजार 611 जोडप्यांनी विवाह नोंदणी करून घेतली आहे. त्यामध्ये सर्वाधिक विवाह नोंदणी 'ब' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत झाली आहे. या कार्यालयात 1 हजार 492 जोडप्यांनी विवाह नोंदणी केली आहे. तर, 'क' क्षेत्रीय कार्यालयात सर्वात कमी विवाह नोंदणी झाली आहे. या कार्यालयामध्ये दोन वर्षात फक्त 683 जोडप्यांनी विवाह नोंदणी केल्याचे आढळले आहे.
विवाह़ाचा कायदेशीर पुरावा
विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे पती-पत्नी दोन्हीही विवाहबद्ध असल्याचा कायदेशीर पुरावा आहे. विवाह नोंदणी दाखला हा अनेक ठिकाणी उपयोगी पडतो. पासपोर्ट, पेन्शन, कोणत्याही कागदपत्राला वारसदार लावण्यासाठी, मुलाचा ताबा मिळविण्यासाठी तसेच वारसा हक्कासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
वधू आणि वर यांचा रहिवासी पुरावा
रेशन कार्ड, वीजबिल, आधार कार्ड याची प्रत.
वधू आणि वर यांचा वयाचा दाखला.
लग्नाची पत्रिका व लग्नामधील एक फोटो
विवाह नोंदणी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांनी विवाहानंतर नोंदणी करून घ्यायला हवी. विविध कागदपत्रांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते. सध्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर दर आठवड्याला सरासरी 15 जोडप्यांची विवाह नोंदणी होते.
– डॉ. बाळासाहेब होडगर, उपनिबंधक (विवाह नोंदणी), 'अ' क्षेत्रीय कार्यालय
क्षेत्रीय कार्यालयानुसार झालेली विवाह नोंदणी
क्षेत्रीय वर्ष वर्ष
कार्यालय 2021-22 2022-23
अ 537 622
ब 729 763
क 337 346
ड 488 647
ई 654 537
फ 497 543
ग 411 402
ह 572 526