पुणे

तळेगाव ढमढेरे : कुर्‍हाडीचा घाव घालत महिलेचे दागिने लांबवले

अमृता चौगुले

तळेगाव ढमढेरे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : अरणगाव (ता. शिरूर) येथील तोंडेवस्ती येथे शनिवारी (दि. 10) रात्रीच्या सुमारास दोन कुर्‍हाडधारी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. तीन घरात चोरी करून एका महिलेच्या डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घालून तिचे दागिने चोरून नेले. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बायडाबाई गणपत तांबे (वय 65) असे चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बाबाजी गणपत तांबे (वय 35, दोघे रा. तोंडेवस्ती, अरणगाव, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.

अरणगाव येथील तोंडेवस्तीवर तांबे यांचे घर आहे. बायडाबाई तांबे या घरात झोपलेल्या असताना शनिवारी मध्यरात्री हातात कुर्‍हाड घेऊन दोन चोरटे घरात घुसले. त्यांनी घरात शोधाशोध सुरू केली असता बायडाबाई जाग्या झाल्या. या वेळी चोरट्यांनी 'ओरडू नको; नाहीतर मारून टाकीन,' अशी धमकी बायडाबाई यांना दिली. तर एकाने त्याच्या हातातील कुर्‍हाडीने बायडाबाई यांच्या डोक्यात घाव घालत त्यांना जखमी केले आणि त्यांच्या अंगावरील एक तोळा वजनाचे दागिने काढून घेतले. त्यांनतर बायडाबाई यांनी आरडाओरडा केल्याने बाबाजी तांबे जागे झाले असता चोरटे पळून गेले. जखमी बायडाबाई यांना उपचारासाठी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चोरट्यांनी पुढे तांबे यांच्या शेजारी राहणारे धनंजय तोंडे व चंदर भांड यांच्यादेखील घरात चोरीचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, पोलिस उपनिरीक्षक रज्जाक शेख, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने, शंकर साळुंके, अमोल दांडगे, संतोष मारकड यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजीत पठारे हे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT