Daund Leopard Attack: कडेठाण (ता. दौंड) येथे बिबट्याच्या हल्ल्यात लताबाई बबन धावडे (वय ५०) या महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि. ७) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, शनिवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान लताताई धावडे आपल्या उसाच्या शेतात काम करीत होत्या. याच दरम्यान बिबट्याने लताबाई यांच्यावर झडप घालत त्यांना तो ऊसामध्ये घेवून गेला. मात्र कुठलीही हालचाल करण्यास न मिळाल्याने काही क्षणातच धावडे यांचा मृत्यू झाला. लताबाई यांच्या मागे पती, विवाहित मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान या घटनेने कडेठाण गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेली अनेक दिवसांपासून बिबट्याचा ऊसाच्या परिसरात वावर वाढला गेला असून यामुळे नागरिक त्रस्त व भययीत झाले आहेत. पाळीव प्राण्यासह बिबट्याने आता नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. एकाच महिन्यात दोन बळी घेल्याच्या घटना घडल्या आहेत.
दोन आठवड्यापूर्वी बोरीपार्धी हद्दीत एका अडीच महिन्याच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर वन विभागाने पिंजरा लावून बिबट्या पकडला होता. त्यानंतर एक बिबट्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. मात्र शनिवारी पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला करीत महिला ठार केली असल्याने दौंड तालुक्यात किती बिबट्याचा वावर आहे हे कळण्यास मार्ग उरला नाही.
वरवंड, कानगाव, केडगाव, पाटस, नानगाव या ऊसाच्या पट्ट्यातील गावामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून या भागातील शेतकरी शेतात कामाला जाण्यास देखील नकार देऊ लागला आहे. महिलेच्या मृत्यूमुळे नागरिकांनी वन विभागाकडे बोट दाखवत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेचा तपास यवत पोलीस ठाणे, वन विभाग करीत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात लताबाई धावडे या शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. बिबट्यांचा प्रजननावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन पातळीवर धोरण आणणे किती गरजेचे आहे हे या दुर्देवी घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले गेले आहे.- राहुल कुल, आमदार, दौंड