पुणे

पिंपरी : पगार मागणार्‍या महिलेला शिवीगाळ करीत मारहाण

अमृता चौगुले

पिंपरी : थकलेला पगार मागणार्‍या महिलेला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी (दि. 21) सकाळी साडेदहाच्या सुमारास सिटी प्राईड कॉम्प्लेक्स, आकुर्डी येथे घडला. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हर्षद कमाल खान (23) याच्यावर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करीत त्यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आरोपीच्या ऑफिसमध्ये सफाईचे काम करीत होत्या.

दरम्यान, तीन महिन्यांचा पगार थकल्याने सोमवारी सकाळी त्यांनी आरोपीकडे पैशाची मागणी केली. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, मारहाण करीत फिर्यादी यांची ओढणी खेचून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणात निगडी पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. मात्र, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT