वेल्हे: पानशेत (ता. राजगड) येथील दाट वर्दळीच्या रस्त्यावर लाथा-बुक्क्यांनी तसेच दगडाने ठेचून आदिवासी कातकरी समाजाच्या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. घटनेनंतर मोटारसायकलवरून आलेले सर्व हल्लेखोर फरार झाले.
रोहिदास काळुराम काटकर (वय 24, रा. कादवे, ता. राजगड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री 8 वाजेच्या सुमारास पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेलसमोर घडली. (Latest Pune News)
या घटनेमुळे पानशेत, वरसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून युवकाच्या खुनामुळे आदिवासी कातकरी समाजावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी पाच अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
मयत रोहिदास काळुराम काटकर व मोसे (ता. राजगड) येथील विजय पांडुरंग जाधव हे दोघे जण पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेलसमोर उभे होते. त्या वेळी मोटरसायकलवरून आलेले 20 ते 25 वयोगटातील पाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अचानक लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
मयत रोहिदास काटकर याच्यावर एकाच वेळी सर्व हल्लेखोरांनी जोरदार प्रहार केले. त्यावेळी एका हल्लेखोराने रस्त्यावर पडलेल्या मोठ्या दगडाने रोहिदास याच्या छातीवर जोरदार प्रहार केला. त्यात रोहिदास याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात विजय जाधव हा देखील जखमी झाला आहे.
याप्रकरणी मयत रोहिदास काटकर याचा भाऊ अविनाश काटकर याने वेल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वेल्हेचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक अमित देशमुख या घटनेचा तपास करीत आहेत. पानशेत पोलिस चौकीचे पोलिस अंमलदार आकाश पाटील, युवराज सोमवंशी, ज्ञानदीप धिवार आदी पोलिस जवानांसह वेल्हे व ग्रामीण पोलिस फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
हल्लेखोरांना शोधण्याचे मोठे आव्हान
रात्रीच्या सुमारास घटना घडल्याने तसेच खुनाचे कारण स्पष्ट झाले नसल्याने पोलिसांपुढे गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. पानशेत बाजारपेठ, पानशेत वसाहत तसेच पुणे-पानशेत रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोर दुचाकी गाड्यावरून आले होते, तसेच ते त्याच गाड्यावरून फरार झाल्याचे प्राथमिक पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे, असे पानशेत पोलिस चौकीचे पोलिस अंमलदार आकाश पाटील यांनी सांगितले.