आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाट्याच्या नजीक आयशर ट्रक व पिकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने ट्रकला भीषण आग लागली. ज्यामध्ये आयशर पूर्णपणे जळून खाक झाला. ही घटना रविवारी (दि. २३) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पिकअप चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओही पुढे आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे एक मालवाहू आयशर ट्रक हा नाशिकच्या दिशेने जात होता. यावेळी समोरून येणारा मालवाहतूक पिकअप त्यावर येऊन आदळला. अपघात इतका भयानक होता की एकमेकाच्या विरुद्ध दिशेने हे ट्रक जाऊन पडले. या भीषण अपघातात आयशर ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणाच्या आत ट्रक आगीत भस्मसात झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. हा अपघात आळेफाट्याच्या नजीक कलासागर समोर झाला.
या घटनेची माहिती मिळताच आळेफाटाचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी योग्य त्या सूचना दिल्या. आग इतकी भयंकर होती की काही वेळातच संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची काही वेळ कोंडी झाली. मागील काळात मालवाहतूक वाहनांना आग लागण्याच्या घटना लक्षात घेता महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशानाही या वाहतूककोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या.