पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणेकरांनी टि्वटरच्या, तसेच रिल्सच्या माध्यमातून पोलिसांच्या नियमांवर बोट ठेवले होते, त्यातच आता वाहतूक पोलिसांच्या भोंगळ कारभाराचा पाढाच ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी वाचलाय. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी मार्मिक शब्दांत त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. प्रा. नरके यांची गाडी अडविल्यानंतर कागदपत्रांची मागणी करीत त्यांना वाहतूक महिला कर्मचार्याने धारेवर धरले. तब्बल बारा मिनिटांनंतर त्यांच्याकडून पोलिसांच्या हाती काही लागले नाही. या वेळी संबंधित महिला कर्मचार्याने जणू आपल्याला साक्षात्कार झाल्यासारखा अजब दावा करीत लायसन्स नसणारेच नियम पाळतात, असा शोध लावला.
दोन दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात प्रा. नरके पुस्तकांचे पार्सल घेण्यासाठी गेले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार चौकात आठ ते दहा वाहतूक पोलिस नियमन सोडून वसुलीचे काम करीत होते. नरकेंची गाडी एका महिला कर्मचार्याने थांबवली. अत्यंत उर्मठ शब्दांत लायसन्सबाबत त्यांना विचारले. मागे नरके यांनी त्यांना 'आमचे काही चुकले का?' अशी विचारणा केली. त्यावर त्यांना 'सरकारी कामात अडथळा आणू नका बोलून, नाहीतर आत टाकीन,' असा बाईंनी दम दिला. त्यांना आलेला अनुभव त्यांनी व्यक्त केला.
असा आहे तो अजब दावा…
नरके यांनी त्यांना परत विचारलं, 'काय झालं, आम्हाला का अडवले आहे? आमचा कामाचा खोळंबा होतोय. मागे ट्रॅफिक जाम झालीय. तुम्हाला आमची कोणती चूक दिसली?' त्यावर त्या म्हणाल्या, 'ज्यांच्याकडे लायसन्स नसते ते नियम पाळतात. तुम्ही नियम पाळत होता म्हणून लायसन्स नसणार, यासाठी अडवले.'
सवाल विचार करायला लावणारा
'नियम पाळल्याबद्दल ट्रॅफिकमध्ये अडवणे, मुजोरीने बोलणे, सगळेच ठीक आहे म्हटल्यावर पैसे न मागता जाऊ देणे, हे पाहून पुण्याच्या ट्रॅफिक खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करायला हवा, असे मला वाटते. आपण काय सांगाल?' असा सवाल नरके यांनी उपस्थित केला आहे.