सोशल मीडिया  File Photo
पुणे

कीर्तनकारांच्या राजकीय प्रचारावरून सोशल मीडियात वादळ

भुकेले शास्त्रींची मुलाखत ठरली वादळी; रवींद्र पोखरकरांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

आळंदी : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गावागावांमध्ये कीर्तन करणार्‍या वारकरी संप्रदायातील काही महाराजांचा राजकारणासाठी कसा वापर झाला, या विषयाला हात घालत वारकरी संप्रदाय कायम अशा राजकारणापासून लांब राहिला आहे, पण काही कीर्तनकारांनी भाजपाची बाजू घेत गावोगावी धर्मावर आधारित प्रचार केला. त्याचा भाजपाला फायदा झाला,

असा रोख व्यक्त करणार्‍या मुक्त पत्रकार, स्तंभलेखक रवींद्र पोखरकर यांच्यावर ठाणे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर खरंच महाराजांनी प्रचार केला का? पोखरकर बरोबरच आहेत का ? अशा उलट-सुलट आशयाच्या पोस्टने सध्या सोशल माध्यमे दणाणून गेली आहेत.

पोखरकरांचे समर्थन करणारी आळंदी येथील जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त राहिलेले, वारकरी संप्रदाय प्रबोधन चळवळीत काम करणारे दिनकर शास्त्री भुकेले यांची विशेष मुलाखत पोखरकर यांनी आपल्या यूट्युब चॅनलसाठी घेतली होती. हीच मुलाखत वादळी ठरली असून, या व्हीडिओत असलेल्या तपशिलावर आक्षेप घेत भाजपाच्या ‘सोशल मीडिया सेल’चे संयोजक प्रकाश गाडे यांनी ठाणे पोलिसांत ‘माझ्या व माझ्यासारख्या अनेक हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या’ असं म्हणत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार ठाणे शहरातील डायघर येथील पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 299 अंतर्गत पोलिसांनी पोखरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. याची माहिती गाडे यांनीच त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर दिली. पोलिसांनी अद्याप पुढची कारवाई केली नसली, तरीही हा व्हिडीओ, त्यावरच्या कारवाईचा हेतू, या सगळ्या अनुषंगानं समाजमाध्यमांवर त्यावरून वादळी चर्चा सुरू आहे.

आळंदीत जोरदार चर्चा

दरम्यान, वारकर्‍यांच्या दृष्टीने केंद्रस्थानी असणारे तीर्थक्षेत्र आळंदी शहरातदेखील या गोष्टीची दबक्या आवाजात चर्चा असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराज मंडळींसाठीचे काही कार्यक्रम आळंदीत झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील वारकर्‍यांच्या दोन-तीन कार्यक्रमांना स्वतः हजेरी लावली होती. सातारा भागातील वारकर्‍यांचा कार्यक्रम तर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीने विशेष गाजला होता. यामुळे पोखरकर - शास्त्री मुलाखत प्रकरण आळंदीत चांगलेच चर्चेत असून, खासगीत याची जोरदार चर्चा आहे. अगोदरच बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे उघड झाल्यानंतर अनेक संस्था अधिकृत आहे की नाही याचा चौकशीचा ससेमिरा मागे लागलेल्या आळंदीतील महाराज मंडळींवर पोखरकर प्रकरणामुळे सोशल माध्यमावर टीकात्मक चर्चेला सामोरे जावे लागत असून, त्यांच्या मागच्या अडचणी काही कमी होण्याची नाव घेत नसल्याचे चित्र आहे.

राजकीय पक्षांच्या आघाड्या

अलीकडच्या काळात अनेक राजकीय पक्षांच्या आध्यात्मिक आघाड्या वारकरी संप्रदायात उदयास आल्यानंतरच वारकरी राजकारणाच्या केंद्रबिंदू स्थानी आल्याचे व त्यांचा उघड राजकीय सहभाग दिसू लागल्याचे एका ज्येष्ठ कीर्तनकार महाराजांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT