पुणे

सिंगापूरच्या शेतकर्‍याने अंजीरशेतीतून साधली प्रगती

अमृता चौगुले

अमृत भांडवलकर  : 

सासवड : पुरंदर तालुका हा अंजीर, सीताफळ लागवडीसाठी अग्रेसर आहे. तालुक्यातील सिंगापूर येथील प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे यांनी 30 गुंठ्यांवरील अंजिराच्या शेतीतून 14 टन विक्रमी उत्पादन घेऊन 10 लाख रुपयांचा घसघशीत नफा मिळविला आहे. त्यांना कृषी विभागाकडून शेततळे तसेच कृषीविषयक प्रशिक्षण मिळाले असून, त्याचा त्यांना मोठा फायदा झाला आहे.
अभिजित यांची कोरोना महामारीच्या काळात नोकरी गेली. त्यानंतर त्यांनी पूर्णपणे शेतीकडे लक्ष वळविले. त्यांची वडिलोपार्जित 9 एकर शेती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांनी शेती बारमाही बागायती केली. त्यासाठी कृषी विभागातून शेततळ्यासाठी 3 लाख 30 हजार रुपयांचे अनुदान मिळाले. त्यांनी शेतीत अंजीर 4 एकर, सीताफळ 3 एकर व जांभूळ पाऊण एकर, अशी फळझाड लागवड केली.

जर्मनीतदेखील निर्यात
अंजीर फळाची बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे पॅकिंग करून प्रतवारीनुसार मालाची विक्री सासवड, पुणे, मुंबई, कोल्हापूर, हैदराबाद, गुजरात व दिल्ली येथे केली जाते. मागील वर्षी जर्मनी देशातून अंजिराला मागणी आल्याने त्यांनी प्रायोगिक स्वरूपात 100 किलो मालाची निर्यात केली. महाराष्ट्रासह हैदराबाद, गुजरात, राजस्थान आदी ठिकाणचे शेतकरी लवांडे यांची अंजीरबाग पाहावयास येतात व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. त्यांच्या अंजीरबागेत 7 ते 8 लोकांना नियमित रोजगार मिळाला असून, ही एक जमेची बाजू आहे. लवांडे यांनी अंजिराचे नवीन सुधारित वाणही तयार केले आहे.

अंजीरशेतीतून साधली प्रगती
यामध्ये वडील व काकांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. ठिबक सिंचनासाठी अनुदान मिळावे, यासाठी त्यांनी कृषी विभागात प्रस्ताव सादर केला आहे. कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून कृषी विस्तार योजनांच्या प्रशिक्षण शिबिरातून शेतीमध्ये अनेक सुधारणा घडून आल्या.

अंजीर फळबाग लागवड
अभिजित यांनी 4 एकरामध्ये पूना पुरंदर या वाणाच्या 600 अंजीर झाडांची लागवड केली. खट्टा आणि मिठ्ठा अशा दोन्ही बहारात उत्पादन घेतले जाते. खट्टा बहारमध्ये जून महिन्यात छाटणी करून साधारण साडेचार महिन्यांनंतर फळतोडणीस सुरुवात होते. प्रतिझाडापासून 100 ते 120 किलो, तर एकरी उत्पादन 13 ते 14 टन मिळते. या बहारात प्रति किलोचा दर 80 ते 100 रुपये येतो. मिठ्ठा बहारमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात छाटणी व त्यानंतर साडेचार महिन्यांनंतर फळतोडणीस सुरुवात होते. या बहाराच्या फळांस प्रति किलो 85 रुपयांपर्यंत दर मिळतो.

सेंद्रिय शेतीचा फायदा
अभिजित लवांडे यांनी सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे. त्यामुळे फळांची गुणवत्ता वाढली आहे. त्यांनी जीवामृत, घन जीवामृत, दशपर्णी अर्क, निमास्त्र अशा प्रकारचे जीवामृत अंजीर झाडास वापरले. तसेच गांडूळ खत, शेण खत, कंपोस्ट खत, भूशक्ती (कोंबडी खत) व हिरवळीच्या खतांचा वापर केला. अंजिराच्या चांगल्या उत्पादनासाठी इतर शेतकर्‍यांपेक्षा बहार धरण्याचे महिने बदलले, पाचटांचा वापर करून जीवाणूंची संख्या वाढवली, झाडांभोवती पाचटांचे आच्छादन करून कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेण्याकडे भर दिला. यांत्रिकीकरणावर जास्त भर दिला. तोडलेला माल बागेतून बाहेर काढणे आणि फवारणीसाठी आधुनिक यंत्रणा वापरण्याकडे भर दिला. त्यांनी वेळोवेळी कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT