Pune: मंत्रिपदावरील व्यक्तींसाठी सुट्या, सुट्या घेण्याची पद्धती, कार्यक्षेत्राच्या बाहेर जाणार असल्यास मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना कळविण्याबाबतचा नियम करावा, अशी मागणी अॅड. असीम सरोदे यांनी केली आहे. या मागणीबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याचे मुख्य सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व आमदार हे कायद्यानुसार लोकसेवक आहेत. त्यामुळेच या लोकसेवकांसाठीसुद्धा सुट्यांबाबतची कायदेशीर प्रक्रिया स्पष्टपणे नमूद करणारे नियम व कायदे करणे गरजेचे आहे. त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमांबद्दल राज्याच्या मुख्य सचिवांना, मंत्रालयाच्या सचिवांना कळवावे.
जर ते शासकीय कामांसाठी राज्याबाहेर जाणार असतील, सुटीवर, राज्याच्या बाहेर सुटीवर, व्यक्तिगत कामांसाठी सुटीवर जाणार असतील तरी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना तसेच मंत्रालयाच्या सचिवांना कळवावे व सुटीचा अर्ज मंजूर करून घ्यावा. याखेरीज, लोकसेवकांनी घेतलेल्या सुट्यांची माहिती नागरिकांसाठी माहिती अधिकारात उपलब्ध असावी आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.