पुणे

रानडुकराच्या हल्ल्यात भाविकांची रिक्षा दरीत

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  पानशेत धरण खोर्‍यातील वरघड (ता. वेल्हे) येथे जोगोबा देवाच्या दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या रिक्षावर एका उन्मत रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यामुळे रिक्षा 400 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक भाविक जागीच ठार, तर त्याचा चुलत पुतण्या गंभीर झाला. यामध्ये रिक्षाचालकासह दोघांना जबर मार लागला आहे. सिंहगड मावळा जवान संघटनेच्या गिर्यारोहक रेक्स्यू पथकाचे तानाजी भोसले यांनी जिवाची बाजी लावत दुर्गम कातरखडकाच्या अतिबिकट खोल दरीत उतरून स्थानिक युवकांच्या मदतीने गंभीर जखमी तसेच मृत भाविकाचा मृतदेह बाहेर काढला. अत्यंत बिकट दरीत मध्यरात्री दीड वाजता सुरू झालेले खडतर 'रेस्क्यू ऑपरेशन' शुक्रवारी (दि. 24) पहाटे चार वाजता पूर्ण झाले. भोसले यांचे साहस पाहून स्थानिक ग्रामस्थ, पोलिस प्रशासन थक्क झाले.

भागुजी धाऊ मरगळे (वय 60, सध्या रा. नसरापूर, मूळ रा. शिरकोली, ता. वेल्हे) असे मृत्यू झालेल्या भाविकाचे नाव आहे. मयत मरगळे यांचा चुलत पुतण्या पांडुरंग धाऊ मरगळे (वय 45 , रा. शिरकोली, सध्या रा. डोणजे) हा गंभीर झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी रिक्षाचालक सुरेश कोंडीबा ढेबे (रा.पोळे, ता. वेल्हे) व अशोक बबन मरगळे (वय 31, रा. शिरकोली) अशी इतर दोन जखमींची नावे आहेत.

मयत भागुजी मरगळे व इतर दोघे जण हे सुरेश ढेबे यांच्या रिक्षाने गुरुवारी (दि. 23) मध्यरात्री 12 च्या सुमारास पानशेत धरणाजवळील वेल्हे-कादवे खिंडीतील कच्च्या रस्त्याने वरघड येथील जोगाबा देवस्थानकडे चालले होते. उंच डोंगर माथ्यावरील कच्च्या रस्त्याने मंदगतीने रिक्षा चालली होती. त्या वेळी अचानक एका रानडुकराने रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षा पलटी होऊन वेगाने खोल दरीत कोसळली. रिक्षाचालक सुरेश ढेबे व अशोक मरगळे हे प्रसंगावधानतेने आडरानात उड्या मारून बाहेर पडले. मात्र, पाठीमागे बसलेले भागुजी मरगळे व पांडुरंग मरगळे हे रिक्षासह खोल दरीत तळागाळापर्यंत फेकले गेले. यामध्ये खडक, धोंड्यांचा मार लागून भागुजी मरगळे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वेल्हेचे सहायक पोलिस फौजदार सुदाम बांदल, पोलिस जवान ज्ञानेश्वर शेडगे व वैजनाथ घुमरे यांनी मध्यरात्री घटनास्थळी धाव घेतली. शिरकोली, कादवे येथील युवक, ग्रामस्थही दाखल झाले. मणेरवाडी (ता.हवेली) येथील मावळा जवान संघटनेच्या गिर्यारोहक रेस्क्यू ऑपरेशन पथकाचे तानाजी भोसले हे माहिती मिळताच अर्धा तासात घटनास्थळी दाखल झाले. क्षणाचाही विलंब न करता मध्यरात्री दीड वाजता काळोखात मोबाईल बॅटरीच्या अंधुक प्रकाशात दोरखंडाच्या साह्याने स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी रेस्कु ऑपरेशन सुरू केले, जे पहाटे संपले.

स्थानिक कार्यकर्ते सुनील मरगळे, नितीन ढेबे, संतोष साळेकर, मारुती मरगळे, सुनील मरगळे, चैतन्य पोळेकर, सुरेश शिर्के, सदाशिव शेळके, अर्जुन शिर्के आदी मदतकार्यात सहभागी झाले होते. मयत व जखमींना शासन निर्णयानुसार वन विभागाने मदत द्यावी, अशी
मागणी शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT