पुणे

पुणे : लाल मिरचीचा ठसका! वर्षभरात किलोमागे 20 ते 130 रुपयांची भाववाढ

अमृता चौगुले

शंकर कवडे

पुणे : भाजी करायची म्हटलं, तर तिखट लागतेच. गेल्या काही दिवसांत गॅस, खाद्यतेल यांची दरवाढ सोसत होतो. आता लाल मिरचीचे भावही विक्रमी पातळीवर पोहचले आहेत. त्यामुळे साहजिकच लाल तिखट, काळं तिखट तसेच अन्य मसालेही महाग होणार आहेत. जीवनावश्यक वस्तू अशा महाग होत राहिल्या, तर सर्वसामान्यांनी जगायचे कसे? हे सरकारनेच सांगावे, अशी प्रतिक्रिया गृहिणी सायली तिकोणे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली.

जीवनावश्यक वस्तू असलेल्या गॅस, खाद्यतेलांच्या महागाईमध्ये आता मिरचीची भर पडली आहे. खाद्यतेल स्वस्त होत असतानाच पुन्हा महाग होत आहे. त्यात मिरचीची भाववाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणींचे बजेट वाढले आहे. सद्य:स्थितीत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार बाजारात दररोज तीस किलोच्या अडीचशे ते पाचशे पोत्यांची आवक होत आहे. मिरचीच्या जुन्या साठ्यातील चांगल्या प्रतीचा माल संपला आहे. तर, दुय्यम दर्जाचा माल कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे भावात वाढ झाली आहे.

याखेरीज महाराष्ट्रातील जालना येथून येणार्‍या नवीन हिरव्या मिरचीला चांगला दर मिळत आहे. कर्नाटकातून दिवाळीमध्ये ब्याडगी, गुंटूरचा नवीन माल बाजारात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वादळ झाल्यामुळे त्याचा फटका पिकांना बसला आहे. तसेच, जे उत्पादन हाती येणार आहे ते एक ते दीड महिने लांबणीवर पडले आहे. त्यामुळे बाजारात मिरचीच्या दरात वाढ झाल्याचे मिरची व्यापारी सोपान राख यांनी सांगितले.

आंध्र प्रदेश, कर्नाटक,
मध्य प्रदेशात सर्वाधिक उत्पादन
भारतामध्ये आंध्र प्रदेशात सर्वाधिक लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर कर्नाटक आणि पाठोपाठ मध्य प्रदेशात उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील खान्देशात लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. तेलंगणात तिखट, तर कर्नाटकात कमी तिखटाच्या मिरचीचे उत्पादन घेण्यात येते. याशिवाय आसाम आणि पश्चिम बंगाल, पंजाब राज्यांमध्येही उत्पादन घेतले जाते.

मिरची नोव्हेंबर 2021 प्रतिक्विंटल (रुपये) नोव्हेंबर 2022 प्रतिक्विंटल (रुपये) झालेली भाववाढ प्रतिक्विंटल (रुपये) सध्याचे दर प्रतिकिलो
गुंटूर 15 हजार ते 17 हजार 27 हजार ते 28 हजार 11,000 ते 12,000 280 ते 310
तेजा 19 हजार ते 20 हजार 25 हजार ते 26 हजार 6,000 280 ते 310
ब्याडगी 28 हजार ते 32 हजार 30 हजार ते 50 हजार 2,000 ते 13,000 520 ते 540

शीतगृहातील चांगल्या प्रतीचा माल संपला असून, सध्या दुय्यम दर्जाचा माल काही प्रमाणात शिल्लक आहे. दरम्यान, गेल्या वर्षी मिरची उत्पादन क्षेत्रास अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मिरचीचे नुकसान झाले होते. यामध्ये जवळपास 60 ते 70 टक्के उत्पादनात घट झाली होती. यंदाही पावसाचे संकट राहिल्याने बाजारातील आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने मिरचीची दरवाढ झाली आहे.
                                                            – वालचंद संचेती,
                                                        मिरची व्यापारी, मार्केट यार्ड

SCROLL FOR NEXT