देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : 'श्री क्षेत्र देहूतील इंद्रायणी नदीत ज्या पाण्यात आम्ही स्नान करतो, जे पाणी तीर्थ म्हणून मनोभावे प्राशन करतो त्या पाण्यात मृत माशांचा खच…!' पालखी प्रस्थान सोहळा काही दिवसांवर आला असताना इंद्रायणीची ही अवस्था पाहून ग्रामस्थ आणि भाविकांकडून तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे. नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन पात्रालगत मृत माशांचा खच पडला आहे. परिसरात दुर्गंधी सुटली आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत माशांची संख्या वाढत असतानाही नगरपंचायत प्रशासनाने पावले न उचलल्याने ग्रामस्थ आणि भाविकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भाविकांच्या आरोग्यालाही धोका?
श्री क्षेत्र देहूमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात. नदीला ऐतिहासिक महत्त्व असल्याने नदीचे पाणी तीर्थ म्हणून पिण्याचीही प्रथा आहे. मात्र, सध्याच्या दूषित पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याचीही शक्यता आहे.
सातत्याने होतात प्रकार
चार वर्षांपूर्वी दहा हजारपेक्षाही जास्त माशांचा मृत्यू झाला होता. गतवर्षीही मोठ्या प्रमाणात मासे मृत्यू पावले होते. अशा घटना वारंवार घडत आहेत. मात्र, प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले असल्याने देहूचे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
पालखी प्रस्थान सोहळा तोंडावर
जगभरातील भाविकांचे आकर्षण असणार्या संत तुकाराम महाराज पालखीचे 10 जूनला प्रस्थान होत आहे. अवघ्या 25 दिवसांवर सोहळा असताना नदी प्रदूषणात वाढ झालेली आहे.
पाण्याचे नमुने तपासणीसाठी
देहूतील इंद्रायणी नदीमध्ये मासे मृत झाले आहेत; परंतु ते मासे कशामुळे मृत्यू पावले आहेत ते समजले नाही. आम्ही पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावरच मासे कशामुळे मृत्युमुखी पडले ते समजेल. त्यानंतर निश्चितपणे सर्वतोपरी उपाय केले जातील, असे देहू नगरपंचायतीचे अभियंता संघपाल गायकवाड यांनी सांगितले.
केमिकलमिश्रित पाणी?
उन्हाळ्यामुळे पात्रातील पाणीसाठ्यात घट होत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत आहे. पाणी गढूळ झाले असून, पाण्यावर जलपर्णीचा वेढा पडल्याने अपुर्या ऑक्सिजनमुळे माशांचा मृत्यू होत असल्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पालखी प्रस्थान सोहळा आढावा बैठकीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नदीपात्रात काही कंपन्या केमिकलमिश्रित पाणी सोडत असल्याचे सांगितले होते. मात्र, याची अधिकार्यांनी कसलीच दखल घेतली नाही.
ड्रेनेजचे पाणी इंद्रायणी नदीत मिसळून मासे मृत होत आहेत, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यापूर्वीही वारंवार असे प्रकार घडले आहेत. नदीचे पाणी भाविक मनोभावे तीर्थ म्हणून पितात, तसेच त्यामध्ये स्नानही करतात, त्यामुळे त्यांनाही धोका निर्माण झाला आहे. पालखी प्रस्थान सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून प्रदूषण रोखण्याची गरज आहे.
– संजय मोरे, पालखी सोहळा प्रमुखदेहूगावामध्ये इंद्रायणी नदीत मासे मृत्युमुखी पडले आहेत. जर दूषित पाण्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असेल, तर शासनाने या घटनेचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना केली पाहिजे. पालखी प्रस्थान सोहळा काही दिवसांवर आला आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी, भाविक-भक्त येतात. इंद्रायणी नदीत स्नान करतात. ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडले असतील, तर असे पाणी आम्ही प्यावे का?
-ह.भ.प. बाळासाहेब जाधव, बरणगाव, जिल्हा धाराशिव