आळंदी : आळंदी येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा संस्थाचालक महाराजानेच विनयभंग केला. या महाराजाला आळंदी पोलिसांनी अटक केली. किरण महाराज ठोसर (वय ३३, रा.आळंदी देवाची, ता. खेड) असे त्याचे नाव आहे. ठोसर याच्या संस्थेत पिडीत मुलगी शिक्षण घेण्यासाठी निवासी राहते. गेल्या सप्टेंबर २०२४ पासून ठोसर मुलीचा विनयभंग करीत होता. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितल्यावर आईने आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत सबंधित महाराजाने सदर मुलीला वेळोवेळी वेगवेगळ्या कारणावरुन हाताने चापट मारत , मारहाण करत तसेच सदर मुलीचे पाठीवरुन व छाती वरती नकोसा वाटणारा स्पर्श करुन वारंवार हात फिरवत तिचा विनयभंग केला असल्याचे म्हटले आहे.या फिर्यादी नुसार महाराजावर भारतीय न्याय संहिता कलम ७५,बालकाचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ९(एफ)१० बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ८२ प्रमाणे ) पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.
शांतता... महिला, बालविकास विभाग झोपलाय
असे प्रकार आळंदीत वारंवार घडत आहेत. निवासी वस्तीगृहात गैरप्रकार घडू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी असणारा महिला व बालविकास विभाग याबाबत ठोस पावले उचलताना दिसून येत नसल्याने आळंदीकरांनी नाराजी व्यक्त केली. निवासी शाळांचे सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.