पुणे

पुणे : लष्करी वर्दी सदैव अलर्ट ठेवते : नौदलप्रमुख राधाकृष्णन हरी कुमार यांचे मत

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'निष्ठा उरी बाळगून देशसेवेसाठी सज्ज झालेल्या तरुणांनी तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे. तीन वर्षे कठोर परिश्रम करून मिळवलेली लष्कराची वर्दी देशप्रेम जागवत असली तरी देशसेवेसाठी सदैव तयार राहण्याची ऊर्मी बाळगावी,' असे आवाहन भारतीय नौदलप्रमुख राधाकृष्णन हरी कुमार यांनी केले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या 143 व्या तुकडीचा बुधवारी (दि. 30) पहाटे दीक्षान्त संचलन सोहळा त्यांच्या प्रमुख उपस्थिती झाला. यावेळी राधाकृष्णन हरी कुमार यांनी या दीक्षान्त संचलनाची मानवंदना स्वीकारली. यावेळी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख संजीव डोगरा, वाईस अ‍ॅडमिरल अजय कोचर यांचीही उपस्थिती होती. यावर्षी 250 कॅडेट्स उत्तीर्ण झाले असून मित्रराष्ट्राच्या कॅडेट्नीदेखील सहभाग नोंदवला होता.

शिस्त, परेड अन् उत्साह…
सैन्य दलात दाखल होण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याचा अनुभव घेत तयार झालेल्या कॅडेट्सचा उत्साह त्यांच्या गगनभेदी घोषणांनी आणखी वाढवत होता. लष्करात शिस्तीला अन् वेळेला किती महत्त्व असते ते आज दिसून आले. पहाटे 7 वाजून 55 मिनिटांनी खडकवासला येथील एनडीएच्या खेत्रपाल मैदानाचा दरवाजा उघडला आणि कॅडेट्च्या घोषणांनी मैदान दुमदुमून गेले.

ध्वज सन्मान अन् मानवंदना…
लष्करी जवान ज्या प्रकारे वर्दीची शान राखतात, त्याही पेक्षा जास्त सन्मान ध्वजाचा करतात. परेड सुरू झाल्यानंतर संचलन करणार्‍यांनी उपस्थित देशप्रेमींना परेड आपल्या समोरून जाण्यापूर्वी ध्वज पुढे जात असेल तर प्रत्येकाने उभे राहून मानवंदना द्यावी, असे आवाहन केले. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सच्या नातेवाइकांबरोबर संचलन पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी दोन्ही परेड संचलनास उभे राहून मानवंदना दिली. त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट उत्तीर्ण कॅडेट्सचा उत्साह वाढवला.

कदम कदम बढाये जा…
प्रबोधिनीचा ध्वज सन्मानपूर्वक मैदानात आणण्यात आला. त्यावेळी उपस्थित जवान, कॅडेट्स व नागरिकांनी ध्वजाला सलामी देत स्वागत केले. 'कदम कदम बढाये जा" या बॅडच्या धूनवर दिमाखदार संचलनाला सुरवात झाली. संचलन बघण्यासाठी उपस्थित असलेले पालकवर्ग, नातेवाईक यांच्याकडून मोबाईलमध्ये क्षणचित्रे टिपली.

मैदानात टापांचा आवाज अन् शांतता…
नौदलप्रमुख राधाकृष्णन हरी कुमार यांना मानवंदना देत कॅडेट्सच्या तुकड्यांनी संचलन केले. विस्तीर्ण मैदानावर होत असलेले संचलन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली असतानाही परेडदरम्यान कॅडेट्सच्या टापांचा आवाज रोमांच उभे करत होता. परेड अंतिम टप्प्यात आली असताना अत्यंत तालबद्ध पद्धतीने पाऊले टाकत कॅडेट्सनी मार्गक्रमण केले.

सुखोई अन् चेतकच्या थक्क करणार्‍या कसरती
शिस्तबध्द पद्धतीने संचलन पार पडल्यानंतर चेतक हेलिकॉप्टर्स आणि सूर्यकिरण विमानांनी 20 मिनिटे हवाई कसरती सादर करीत उपस्थितांचे डोळे दिपवले. कसरती करणारे विमान प्रचंड आवाज करीत कधी अगदी जवळून तर कधी उंच भरारी घेत थेट घिरट्या मारत खाली येत होते. हे पाहताना उपस्थितांचे मोबाईल हे कैद करण्यात रमल्याचे दिसून आले.

तीन कॅडेट्स अन् सन्मान सोहळा…
तीन वर्षांच्या कठीण प्रशिक्षण काळात अनेक कॅडेट्सना हे आपल्याला जमेल का? असे विचार मनात येत होते. मात्र प्रशिक्षक व त्यांना प्रेरणा देणार्‍या प्रत्येक अधिकार्‍याने त्यांचे मनोबल वाढवत देशप्रेम जागे केले. कठीण परिश्रम करून अंगावर लष्कराची मिळालेली वर्दी सर्व विसरायला भाग पाडते, असेही अनेक कॅडेट्सनी सांगितले. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करून गौरव यादवने सुवर्ण पदक, सौरभ शर्माने सिल्व्हर तर विविक मेहला याने कांस्य पदक पटकावले. या तिघांचे नौदलप्रमुख राधाकृष्णन हरी कुमार यांच्या हस्ते मेडल देऊन सन्मान करण्यात आला.

युद्धनौका 'विक्रांत' पुन्हा सज्ज
'विक्रांत' युद्धनौका पुन्हा नव्या रूपात अवतरली जात आहे. या नौकेवर पुन्हा सर्व यंत्रणा कार्यान्वित करून प्रशिक्षण देता येऊ शकते का? या विषयावर काम सुरू आहे. येत्या मे-जूनपर्यंत ही युद्धनौका प्रशिक्षणासाठी तयार केली जाऊ शकते. महिला खलाशीपदाची भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यात सर्वाधिक महिलांचे अर्ज आलेले असून, लवकरच मोठी महिला खलाशीपद भरती होणार असल्याची माहिती नौदल सेनाप्रमुख आर. हरी कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT