पुणे

Crime News : मेडिकल व्यावसायिकाला लुटले; तिघांना अटक

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  मेडिकल बंद करून घरी जात असलेल्या व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले. यातील तिघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 7 फेब्रुवारी रोजी घडली. व्यंकटेश ऊर्फ हर्षल परशुराम जाधव (20, रा. तायरा कॉलनी, मेदनकरवाडी, चाकण), आदेश परशुराम शिंदे (22, रा. काटे कॉलनी, च-होली फाटा, पुणे), गोविंद लालू रुपवते (19, रा. सद्गुरुनगर, भोसरी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्याच्यासह एका विधीसंघर्षीत मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष दिलीप शहा यांचे वाकड येथे चंदन फार्मासिस्ट नावाने मेडिकलचे दुकान आहे. 7 फेब्रुवारीला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ते मेडिकल बंद करून घरी जात होते.

त्या वेळी पाच अनोळखी तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवून शहा यांच्याकडील 45 हजार 560 रुपये असलेली बॅग जबरदस्तीने काढून घेऊन दुचाकीवरून पळून गेले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये बॅग जबरदस्तीने चोरून नेत असताना पाचजण दिसत होते. त्यांनी तोंडाला मास्क लावले असल्याने त्यांची ओळख पटवणे अवघड होते. मात्र, आरोपी घटनास्थळाजवळ बराच वेळ फिरत असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे आरोपींना शहा हे पैसे घेऊन येणार असल्याचे माहिती होते, असा संशय पोलिसांना आला. या संशयावरून पोलिसांनी तपास सुरू केला. तसेच, आरोपी पळून गेलेल्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.

त्यानंतर आरोपी भोसरी परिसरात नेहमी एकत्र येत असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, भोसरीतील एका निर्जन स्थळी बसलेल्या अल्पवयीन मुलासह चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आणखी एका साथीदाराचे नाव सांगितले आहे. यातील अल्पवयीन मुलगा पूर्वी आशिष शहा यांच्या मेडिकल दुकानात काम करत होता. मालक केव्हा रोख रक्कम घेऊन जात असतात, याबाबत त्याला माहिती होती. या माहितीचा फायदा घेऊन आरोपींनी लूटमार करण्याचा प्लॅन केल्याचे तपासात समोर आले आहे.

यांनी केली कारवाई
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुद्ध सावर्डे, सहायक फौजदार विभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलिस अंमलदार संदीप गवारी, वंदू गिरे, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, दीपक साबळे, अतिक शेख, प्रशांत गिलबिले, रामचंद्र तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, रमेश खेडकर यांनी ही कारवाई केली.

SCROLL FOR NEXT