पुणे

पुणे : भाईंसाठी न्यायालयात येणार्‍यांवर नजर ; सुरक्षेच्यादृष्टीने गुन्हेगारांबाबत पोलिस अलर्ट

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : संतोष जगताप खून प्रकरणात साक्षीदारांना संपविण्याचा कट लोणी काळभोर पोलिसांनी उधळून लावला. न्यायालयात सुनावणीसाठी आल्यानंतर कट शिजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्याच धर्तीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी तारखेसाठी न्यायालयात आणलेल्या भाईंच्या सुनावणीला हजर राहणार्‍या साथीदारांवर 'वॉच' ठेवण्याबाबत पोलिस अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.

शहरात एकीकडे पुणे पोलिस मोक्का, एमपीडीए, कोम्बिंग ऑपरेशन या माध्यमांतून गुंडांवर कारवाई करीत आहेत. न्यायालयात दाखल असलेल्या हजारो खटल्यांच्या सुनावणीसाठी गुन्हेगार टोळीतील भाईंबरोबर त्यांचे साथीदारही न्यायालयाच्या आवारात त्यांच्या बॉडीगार्डप्रमाणे फिरताना बर्‍याच वेळा दिसतात. अनुचित प्रकार टाळण्यासाठी कोर्ट पोलिस असतात. परंतु, सर्वच न्यायालयांच्या ठिकाणी पोलिस उपलब्ध असतात असे नाही. न्यायालयात तारखांसाठी आलेल्या भाईंना भेटण्यास आल्यानंतर एखाद्याचा गेम वाजविण्याचा किंवा खटल्यात मदत व्हावी या दृष्टीने किंवा कारागृहात असताना आपल्या टोळ्या अ‍ॅक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे मागील काही वर्षांतील घटनांमुळे अधोरेखित होते.

त्यातच ऑक्टोबर 2021 मध्ये लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल सोनाईच्या समोर संतोष जगताप व त्याचा अंगरक्षक यांचा भरदिवसा गोळीबार करून खून करण्यात आला होता. सदर घटनेमध्ये समोरासमोरील गोळीबारामध्ये तिघांचा जीव गेला होता. गुन्ह्यातील साक्षीदारांपैकी महत्त्वाच्या साक्षीदारांना संपविण्याचा कट संतोष जगताप खून खटल्यातील मुख्य आरोपींनी शिवाजीनगर कोर्टामध्ये तारखेसाठी आल्यानंतर रचल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती.

त्यांच्या जवळच्या मित्रांना (रेकॉर्डवरील गुन्हेगारांना) काही लाख रुपयांची सुपारी देऊन कट रचला गेला होता. हा कट उधळत पोलिसांनी गावठी पिस्तुल आणि तीष्ण हत्यारांसह सराईतांना बेड्या ठोकल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी न्यायालयातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने भाईंच्या साथीदारांवरही आता पोलिसांची करडी नजर असणार आहे.

न्यायालयाच्या गेटबाहेरच जथ्थ्याला रोखणे गरजेचे

कारागृहात तारखेसाठी एक ते दोन जणांचे काम असते. बर्‍याच वेळा मोक्का व तत्सम गुन्हेगारांच्या खटल्याच्या केसच्या वेळी गुन्हेगाराला फॉलो करणार्‍या तरुणांचा तसेच साथीदारांचा जथ्था न्यायालयाच्या आवारात हजर असल्याचे दिसते. न्यायालयाच्या एक, तीन, चार नंबरच्या गेटमधून हे साथीदार एंट्री मिळवतात. या जथ्थ्याला न्यायालयाच्या आवाराबाहेर रोखणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT