वाफगाव(ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील पूर गावात बुधवारी (दि. 18) सकाळच्या सुमारास तीन ते चार बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे या परिसरातील गावांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. उजाड माळरानावर बिबट्यांचा वावर सुरू झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांतील ऊस उत्पादक क्षेत्रात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, खेड तालुक्याच्या पूर्वेकडील दुष्काळी भागात बिबट्या आढळल्याने या ठिकाणच्या ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पूर येथे बुधवारी (दि. 18) सकाळी साडेआठच्या सुमारास उजाड माळरानावर बिबट्याने लांडग्यावर केलेल्या हल्ल्याचा खेळ गावातील तरुणांनी मोबाईलमध्ये टिपला. यामध्ये माळरानावर तीन बिबटे दिसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी वरुडे (ता. खेड) परिसरातदेखील बिबट्या पाहिल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. उजाड माळरानावरदेखील बिबट्या दाखल झाल्याने पूर्व भागातील पूर, कनेरसर व वरुडे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मेंढपाळ व पशुपालन करणार्यांना डोंगरावर गुरे-ढोरे चरण्यासाठी घेऊन जाणे मुश्कील झाले आहे.
बिबट्याच्या भीतीने रात्रीचे पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने पिकांना पाणी असूनही पाणी देता येत नाही. शेतातील मका, ज्वारी या पिकांमध्ये व सामाजिक वनीकरणामधील झाडीमध्ये बिबट्याला लपण्यासाठी जागा असल्याने परिसरात बिबट्या दबा धरून राहणार, या भीतीने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या भागात अनेक शेतकरी उपजीविकेसाठी शेळ्या-मेंढ्या पाळतात.
त्यांच्यामध्येदेखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर वन खात्याने प्रत्यक्ष पाहणी केली असून, जीवितहानी होऊ नये म्हणून पिंजरा लावण्याची मागणी पूरच्या सरपंच प्रतिभा गावडे यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे केली आहे. तसेच, बिबट्याचा वावर असेपर्यंत महावितरणने पूर्व भागातील बिबट्या क्षेत्रात रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, अशीही मागणी येथील ग्रामस्थांनी महावितरणकडे केली आहे.
अधिकारी नॉट रिचेबल
तीन ते चार बिबटे परिसरात असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र विभागाच्या कर्मचार्यांनी परिसराची पाहणी केली आहे. परिसरात कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून उपाययोजनांबाबत संबंधित अधिकार्यांना फोन केला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.