पुणे

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्‍त्‍यावर बांधली झोपडी; वैयक्‍तिक वादातून गावाला धरले वेठीस

निलेश पोतदार

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा आपल्या घरासमोर शेजाऱ्याने शौचालय बांधल्याच्या रागातून एकाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील सिमेंट काँक्रिट रस्त्यावर झोपडी बांधून गावाला वेठीस धरण्याचा प्रकार घोटवडी (ता. खेड) येथे घडला. ग्रामस्थांनी याबाबात तहसीलदार प्रशांत बेडसे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र आठवडा उलटून गेला तरी कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत.

खेड तालुक्यात पश्चिम भागात डोंगर दऱ्यात घोटवडी गाव आहे. परिसरात आढळवाडी ही ३०० नागरीकांची वस्ती आहे. आढळवाडीकडे जाण्यासाठी पाच वर्षांपुर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला काही नागरिकांची घरे आहेत. यातील एका व्यक्तीच्या वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे.

या व्यक्तीच्या राहत्या घरासमोर दर्शनी भागात शेजारच्या व्यक्तीने शौचालय उभारले. त्याची तक्रार स्थानीक ग्रामपंचायतीकडे केली. मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. या बहाद्दराने थेट काँक्रिट रस्त्यावर दगड गोटे आणि राडारोडा टाकून रस्ता अडवला. त्यानंतरही दखल घेत नाही हे पाहून चार लाकडी खांब रोवून त्यावर लाकडाचे छत व त्यावर ताडपत्री घालुन झोपडी बनवली आहे. या व्यक्तीच्या अजब वागण्यामुळे आढळवाडीच्या नागरिकांचे हाल झाले आहेत. दैनंदिन कामासाठी गावात येताना अडचण निर्माण झाली आहे. परिसरात पाऊस पडला आहे. शेतीची कामे सुरू झाली आहेत. परिसरात जाणे येणे किंवा शेतीची अवजारे, बैल, ट्रॅक्टर आदी ने-आण करण्यासाठी अवघड बनले आहे. शाळा, विद्यालय सुरू व्हायला काही दिवस बाकी आहेत. अशात रस्ता अडल्यामुळे नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे विनवणी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यावर अडथळा असल्याची माहिती मिळाली आहे. कारण काहीही असले तरी रस्ता अडवणे चुकीचे आहे. पोलिस संरक्षणात आजच्या आज रस्ता वापरास मोकळा करून दिला जाईल.
– प्रशांत बेडसे,
– तहसीलदार खेड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT