लोणावळा : नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळा-खंडाळा येथील पर्यटनस्थळासह मावळातील विविध पर्यटनस्थळी पर्यटकांनी सायंकाळी गर्दी केली होती. फटाक्यांची आतषबाजी करीत सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटननगरी लोणावळा-खंडाळा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती. मात्र, त्याचवेळी पोलिसांनी उगारलेल्या कायद्याच्या बडग्याच्या कारणास्तव पर्यटकांची संख्या जास्त असूनही गर्दी नेहमी प्रमाणे रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आली नाही. मात्र, सरत्या वर्षाच्या शेवटच्या रात्री हजारो पर्यटकांनी आपापल्या राहत्या ठिकाणी संगीताच्या तालावर ठेका धरत सरत्या वर्षाला निरोप दिला.
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या टायगर, लायन्स व राजमाची या पॉइंट्सह कार्ला, भाजे लेणी, पवना, भुशी, लोणावळा, तुंगार्ली ही जलाशय आणि लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची व कोराईगड या गड -किल्ल्यांवर पर्यटकांची गर्दी कमी असल्याचे दिसून येत होते.
शहरातील अनेक मोठया हॉटेल व्यवसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास मेजवानीसह संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रायव्हसी मिळण्यासाठी मागील काही वर्षांपासून पर्यटक खाजगी बंगले व फार्महाऊसला पसंती देऊ लागले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी यंदा लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांमध्ये फॅमिली क्राऊड जास्त असल्याने नाहक पोलिसांच्या कचाट्यात सापडून सेलिब्रेशन मूडचा सत्यानाश करून घेण्यापेक्षा थांबलेल्या हॉटेलमध्ये किंवा आपल्या बंगल्याच्या आवारात राहून मर्यादित स्वरुपात सेलिब्रेशन करण्यातच पर्यटकांनी धन्यता मानली.
सर्व ऋतूत पर्यटनासाठी नावलौकिक असणार्या लोणावळा-खंडाळा या पर्यटनस्थळांसह मावळातील विविध पर्यटनस्थळे पर्यटकांची आकर्षण ठरत आहे. या पर्यटनस्थळाना भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यातही पर्यटकांचा ओघ कायम असतो. मागील काही वर्षांपासून सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची क्रेज आली आहे. यामुळे या दिवशी लोणावळा खंडाळा येथे येणार्या पर्यटकांची संख्या वाढलेली आहे.