पुणे

खोर : भांडगावच्या विकासासाठी पावणेदोन कोटींचा निधी: खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

अमृता चौगुले

खोर; पुढारी वृत्तसेवा: भांडगाव विविध विकासकामांना 1 कोटी 76 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामांचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.  भांडगाव ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ही बिनविरोध झाल्याने या गावाला विकासकामांच्या बाबतीत देणगीदारांचा वाढता ओघ सध्या पाहायला मिळत आहे. विविध नामांकित कंपनीच्या माध्यमातूनदेखील गावाला निधी दिला जात असल्याचे पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन दोरगे यांनी सांगितले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून भांडगाव चौक सुशोभीकरण व ब्लॉक बसविणे यासाठी 10 लाख रुपये निधी देण्यात आला आहे. जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम यांच्या जिल्हा परिषद निधीतून व पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे यांच्या पाठपुराव्यातून भांडगाव येथील तलाव दुरुस्तीच्या कामासाठी 19 लाख रुपये निधी देण्यात आला असून, गटार लाईन व्यवस्था, अंतर्गत रस्ते करणे यासाठी 1 कोटी 20 लाख रुपये निधी देण्यात आला आहे.

दौंड पंचायत समितीच्या माध्यमातून मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, जिल्हा परिषद शाळा यांना संरक्षण भिंत, ओढ्यावर संरक्षण भिंत, सभा मंडप या कामासाठी 15 लाख, तर सौरदिवे बसविणे 1 लाख 25 हजार रुपये, तर स्मशानभूमी संरक्षण भिंत 10 लाख रुपये निधी देण्यात आल्याची माहिती नितीन दोरगे यांनी दिली आहे.

याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, मधुकर दोरगे, गणेश कदम, माजी उपसभापती नितीन दोरगे, वैशाली नागवडे, राणी शेळके, विठ्ठल दोरगे, सरपंच संतोष दोरगे, उपसरपंच सिंधूताई हरपळे, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT