पुणे

वारजे माळवाडीमध्ये मोबाईलच्या दुकानाला आग

अमृता चौगुले

वारजे; पुढारी वृत्तसेवा: वारजे माळवाडी येथील मुख्य रस्त्यावरील एस. एम. मोबाईल शॉपी या दुकानाला शुक्रवारी (दि. 4) रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुदैवाने आग लागली तेव्हा दुकान बंद असल्याने जीवितहानी टळली. या आगीत सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. माळवाडी रस्त्यावर नव्यानेच हे मोबाईलचे दुकान सुरू झाले होते. शुक्रवारी रात्री ते बंद असताना त्याला आग लागली. याबाबत नागरिकांनी वारजेतील कै. वसंतराव अर्जुन चौधरी अग्निशामक नियंत्रण कक्षास माहिती दिली.

त्यानंतर अग्निशमन केंद्राचे तांडेल, राजेंद्र पायगुडे, चालक गौरव बाठे, फायरमन नीलेश तागुंदे, ऋषिकेश हांडे, गोविंद केंद्रे आदी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत काही क्षणातच या आगीवर नियंत्रण मिळविले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती तांडेल, राजेंद्र पायगुडे यांनी दिली. या आगीमध्ये दुकानात विक्रीसाठी आणलेले नवीन मोबाईलसह इतर साहित्य जळून एकूण सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शेजारील दोन दुकानांच्या बाहेरील नामफलकालादेखील या आगीची झळ बसली आहे.

SCROLL FOR NEXT