पुणे

पुणे : अनधिकृत जाहिरातबाजीला लगाम !

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील अनधिकृत जाहिरातबाजीला आळा घालण्यासाठी महापालिका कठोर झाली आहे. प्रतिफ्लेक्स, बॅनर आणि भित्तिपत्रकांसाठी एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. दंड न भरल्यास संबंधितांच्या मिळकतींवर बोजा चढविण्यात येणार असल्याचे महापालिका आकाशचिन्ह व परवाना विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांंगितले.

शहरात जाहिरात करण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाकडून होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर, पोस्टर, झेंडे आदींना सशुल्क परवानगी दिली जाते. मात्र, महापालिकेचा कोणताही परवाना न घेता शहरात फ्लेक्सबाजी व जाहिरातबाजी केली जाते. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. शिवाय महापालिकेचे उत्पन्नही बुडते.

या पार्श्वभूमीवर आकाशचिन्ह परवाना विभागाकडून अनधिकृत जाहिरातबाजीवर दंडात्मक कारवाई केली जाते. कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 10 फ्लेक्स, बॅनर लावणार्‍यांना आजवर एक हजार रुपये दंड आकारण्यात येत होता. परंतु, यानंतरही असे फलक लावणार्‍यांकडून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने आता प्रत्येक फ्लेक्स आणि बॅनरसाठी एक हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा दंड न भरल्यास ज्या व्यावसायिकाची जाहिरात आहे त्याच्या मिळकतीवर बोजा चढविण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिली आहे.

भित्तिपत्रक लावणार्‍यांवरही कारवाई
शहरात सार्वजनिक ठिकाणी छोट्या व्यवसायांची, तसेच क्लासेसच्या जाहिरातींची भित्तिपत्रके मोठ्या प्रमाणावर लावली जातात. प्रामुख्याने सार्वजनिक सीमाभिंती, शौचालये, मुतार्‍या, विजेचे डी.पी.बॉक्स, बसस्थानके, विजेचे खांब आदींवर जागा मिळेल तेथे भित्तिपत्रके आणि छोटे फ्लेक्स अडकविले जातात. चिटकवलेली भित्तिपत्रके काढण्याचे कामही जिकिरीचे असते. यामुळे कितीही चांगली रंगरंगोटी केली, तरी सार्वजनिक ठिकाणच्या भिंती या विद्रूपच झाल्याचे दिसते. बेकायदा फ्लेक्स, बॅनर सोबतच सार्वजनिक भिंती, विजेचे खांब आणि झाडांच्या बुंध्यावर अशी भित्तिपत्रके लावणार्‍यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT