पुणे

Pune news : माळशेज परिसरात फुलले झेंडूचे मळे

अमृता चौगुले

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज परिसरातील गावांमध्ये झेंडूचे मळे फुलले असून, दिवाळी सणाच्या दिवसांमध्ये झेंडूच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळेल, अशी आशा या भागातील शेतकर्‍यांना आहे. माळशेज परिसरातील झेंडू फुलाला मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, भिवंडी, पुणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, तसेच महाराष्ट्रातील, अन्य शहरांमधून दरवर्षी मोठी मागणी असते. कोळवाडी, पिंपळगाव जोगा, डिंगोरे, बनकर फाटा, उदापूर, धोलवड, नेतवड, माळवाडी, रोहोकडी, आंबेगव्हाण या गावांमध्ये दरवर्षी झेंडू फुलाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या परिसरात झेंडू फुलाच्या वाढीसाठी आवश्यक व पोषक वातावरण असल्याने शेतकर्‍यांकडून झेंडू पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

या वर्षीसुद्धा जून महिन्याच्या शेवटी व जुलै महिन्याच्या सुरुवातीला शेतकर्‍यांनी झेंडू पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. नवरात्र व दसरा या सणांच्या वेळी झेंडू फुलाची मागणी वाढून चांगला बाजारभाव मिळेल, अशी या परिसरातील शेतकर्‍यांना अपेक्षा होती. मात्र, ऐन दसर्‍याच्या दिवशी झेंडू फुलाला प्रतिकिलो पंचवीस ते तीस रुपये बाजारभाव मिळाल्याने शेतकर्‍याच्या अपेक्षांवर
पाणी फिरले.

कवडीमोल दराने झेंडू फुले विकावी लागल्यामुळे झेंडू फुलाच्या उत्पादनाचा खर्चही न निघाल्याने माळशेज परिसरातील शेतकरी हवालदिल व निराश झाला होता. याच नैराश्यातून शेतातील झेंडू फुलांनी बहरलेली झाडे उपटून फेकून दिली. परंतु, येणार्‍या दिवाळी सणाच्या दिवसांमध्ये झेंडूच्या फुलांना मागणी वाढून चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने काही शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील झेंडू पीक तसेच ठेवले आहे. दिवाळीमध्ये झेंडू फुलांची मागणी वाढून झेंडू फुलाला चांगला बाजारभाव मिळेल, अशी माळशेज परिसरातील शेतकर्‍यांना आशा आहे.

नवरात्र व दसरा या सणांच्या वेळी झेंडू फुलाला अपेक्षित बाजारभाव मिळाला नसला तरी शेतकर्‍यांनी निराश होऊ नये. दिवाळीत झेंडू फुलाला मागणी वाढून चांगला व समाधानकारक बाजारभाव मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या शेतात असणारे झेंडू फुलाचे पीक उपटून फेकून देऊ नये. झेंडू फुलाचे पीक उपटून फेकून दिल्याने आपलेच आर्थिक नुकसान होणार आहे. सकारात्मक विचार करून दिवाळी सणाची वाट बघणे गरजेचे आहे.
            – संदीप नेहेरकर, प्रगतिशील झेंडू उत्पादक शेतकरी, डिंगोरे (ता. जुन्नर)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT