चाकण: चाकणमध्ये मागील आठवड्यात झालेल्या खुनाच्या घटनेला वेगळेच वळण मिळाले आहे. हा खून केवळ 2 अल्पवयीन मुलांनी नव्हे तर आणखी सुमारे 5 ते 7 जणांनी अत्यंत नियोजनपूर्वक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेत काही व्यावसायिक मंडळींच्या कुटुंबातील मुलांचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे. यातील तीन ते चार जणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
बुधवारी दि. 30 एप्रिल रोजी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकास लाकडी दांडकी, दगड आणि धारदार हत्यारांनी जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये एका 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. ही धक्कादायक घटना चाकण शहरातील हॉटेल समाधानच्या पाठीमागील बाजूस घडली होती. यामध्ये अरविंद राजे (वय 29, रा. तनुश्री अपार्टमेंट आंबेठाण रोड, नवीन गुडलक हॉटेलमागे चाकण, ता. खेड) याचा खून झाला होता. (Latest Pune News)
याप्रकरणी पोलिसांनी खून व गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील 17 वर्षे वयाच्या 2 अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले होते.दरम्यान, यामध्ये अन्य आरोपींचा समावेश असल्याची शक्यता सुरुवातीपासून व्यक्त केली जात होती. अपेक्षेप्रमाणे काही व्हिडीओसदृश्य पुरावे समोर आल्यानंतर या खुनाच्या घटनेत आणखी काही जणांचा समवेश असल्याची बाब समोर आली.
हे सबळ पुरावे गुन्हे शाखा युनिट 3 यांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी यातील अन्य आरोपींपैकी 3 ते 4 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. अद्यापपर्यंत पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या अन्य आरोपींची नावे उघड केलेली नसली, तरी ताब्यात घेण्यात आलेले अन्य संशयित चाकण येथील एका व्यावसायिक कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यामुळे केवळ अल्पवयीन मुलांनी खून केला नसून अन्य आरोपींचा देखील यात समावेश असल्याची बाब समोर आली आहे. यातील आरोपी आणि सूत्रधार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस पाळेमुळे खोदणार का? हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.