पुणे : हिंजवडीत आयटी कर्मचार्यांना घेऊन जाणार्या खासगी प्रवासी वाहनाला (टेम्पो ट्रॅव्हलर) भीषण आग लागली. यात चार कर्मचार्यांचा होरपळून मृत्यू झाला. याचे पडसाद विधानसभेतही उमटले. यामुळे पुणे आरटीओकडून आता कडक पवित्रा घेण्यात आला असून, खासगी वाहनांच्या तपासणीसाठी धडक मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यामध्ये वाहनांना आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असतात. मात्र, यामध्ये प्रवाशांचा मृत्यू होण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. यामुळे पुणे आरटीओकडून कडक कारवाई करण्यास सुरूवात केली जाणार आहे. आरटीओकडून पुणे शहरातील खासगी प्रवासी वाहतून संघटनांची या आठवड्यातच बैठक घेण्यात येणार आहे. याबैठकीत त्यांना वाहनांच्या फिटनेस तपासणीसह देखभाल दुरूस्ती करण्याच्या कडक सूचना करण्यात येणार आहेत. तसेच, वायुवेग पथकाद्वारे वाहनांची फिटनेस तपासणी, इन्शुरन्स, पीयूसीसह अन्य कागदपत्रांची कडक तपासणी होणार आहे.
उन्हाळा आला की, खासगी वाहनांसोबतच पीएमपीच्या बसला देखील आग लागण्याच्या घटना देखील घडत असतात. त्यामुळे आरटीओने खासगी वाहनांच्या तपासणीसह पीएमपीच्या जुन्या बसच्या तपासणीकडेही विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी पीएमपी प्रवाशांकडून केली जात आहे.
खासगी बसचालकांनी प्रवासी वाहतूक करताना आरटीओच्या परवान्याशिवाय गाडी रस्त्यावर उतरवू नये.
गाडीची वेळेत फिटनेस तपासणी करावी.
योग्यता प्रमाणपत्राचे (फिटनेस सर्टिफिकिट) नुतनीकरण ठराविक कालावधीत करून घ्यावे.
आरटीओ परवान्यासाठी दिलेल्या यादी इतक्याच प्रवाशांची वाहतूक करावी.
अवैधपणे टप्पा वाहतूक करून प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांना गाडीत भरू नये.
गाडीमध्ये परस्पर बदल करून मागची बाजू (ओव्हर हँगींग) वाढवू नये.
लांब प्रवास करताना गाडीमध्ये दोन चालक युनिफॉर्मसह असणे आवश्यक आहे.
गाडीमध्ये प्रथमोपचार पेटी असावी.
गाडीमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी, ती वापरण्याबाबत चालकांना योग्य प्रशिक्षण द्यावे.
प्रवाशांकडून ज्यादा भाडे घेऊ नये.
एसटी महामंडळाच्या तिकीट दरापेक्षा दीड पटपर्यंतच भाडे खासगी वाहतूकदारांनी घ्यावे.
गाड्यांचा मेंटनन्स वेळेत करावा.
गाडीचा इन्शुरन्स आणि कर वेळेत भरावा.
वाहनाला चारही बाजूने आपात्कालीन दरवाजा असावा.
काच फोडण्यासाठी हातोड्याची व्यवस्था करावी.
हिंजवडी भागात घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे परिसरात मोहिम हाती घेण्यात येणार आहे. याद्वारे खासगी प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांची फिटनेस तपासणी, इन्शुरन्स, पीयुसीसह अन्य कागदपत्रांची कडक तपासणी केली जाणार असून खासगी प्रवासी वाहतूक करणार्या संघटनांची लवकरच एकत्रित बैठक बोलवणार आहे. त्यात त्यांना वाहनाच्या फिटनेससह देखभाल दुरूस्ती वेळेत करण्याच्या कडक सुचना केल्या जाणार आहेत.स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे