file photo  
पुणे

ओतूर : बिबट्याच्या भेटीला जाण्याची संधी; बिबट सफारी प्रकल्पाला चालना

अमृता चौगुले

ओतूर : बिबट्या म्हणजे काय? जुन्नर तालुक्यातील बिबट्याचे वृत्त ऐकून इतर जिल्ह्यांतील लोक प्रश्न विचारत असतातच. मात्र, या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. आता चक्क बिबट्याच्याच भेटीला जाण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतर असलेल्या आंबेगव्हाण येथे बिबट सफारीची जागा निश्चित झाली होती. त्यास गुरुवारच्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिबट सफरीला चालना देत असल्याचे नमूद केल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जुन्नर तालुक्यातील नागरिक, पर्यटकांची हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत होती. एकंदरीत हा प्रकल्प आंबेगव्हाण या ठिकाणी निश्चित झाल्याने व त्या प्रकल्प कामाला गती येत असल्याने जुन्नर तालुक्यातील अणे माळशेज पट्ट्यातील ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, उदापूर, मढ, डिंगोरे, डुंबरवाडी, खामुंडी व उर्वरित 50 आजूबाजूच्या गावांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

राज्यातील पहिला पर्यटन तालुका म्हणून जुन्नर तालुका घोषित झाला आहे. या प्रसिद्ध ऐतिहासिक तालुक्यात तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे, बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास यामुळे तुलनेने पर्यटकांची संख्यादेखील अधिक असते, त्यामुळे बिबट सफारीलाही चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचे मत येथील पर्यटकांनी दै. 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केले आहे.

माणिकडोह येथील बिबट्या पुनर्वसन केंद्रात जागेचा अभाव असल्याने जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करून या केंद्रात काही वर्षांपासून असलेले बिबटे नैसर्गिक अधिवासात ठेवण्याचा विचार पुढे येऊन आंबेगव्हाण येथील 150 हेक्टरहून अधिक वनक्षेत्र व त्यापैकी 50 हेक्टर जागेची निवड करून तेथे ही सफारी सुरू करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

राज्यभरातून जुन्नर तालुक्यात पर्यटक येण्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. जुन्नर तालुक्यात येणार्‍या पर्यटकांचा ओघ अधिक असल्याने तसेच नैसर्गिक अधिवास, मुबलक पाणी, शांत वातावरण, दाट झाडी, मुबलक जागा,ओढे, रस्ते यामुळे 'बिबट सफारी'साठी आंबेगव्हाण येथील जागेची निश्चिती करण्यात आली आहे.

'सिंह सफारी'च्या धर्तीवर 'बिबट सफारी'
गुजरातमधील गीर अभयारण्यात 'सिंह सफारी' काही वर्षांपासून सुरू आहे. जुन्नर वन विभागातर्फे नुकतीच या सफारीच्या जागेची पाहणी करण्यात आली होती. त्या धर्तीवर आंबेगव्हाण येथे या सफारीत पर्यटकांना नैसर्गिक अधिवासात बिबट्या पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT