नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करून जास्त व्याजाने परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांचा गंडा घालणार्या मच्छिंद्र लक्ष्मण मडके (रा. तांबे, ता. जुन्नर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली आहे. वारूळवाडी येथील टोमॅटो मार्केट( मांजरवाडी रोड) येथे मच्छिंद्र मडके याने वीनस ट्रेडिंग ग्रुप नावाचे शेअर मार्केटिंग ग्रुप ही खासगी कंपनी चालू केली होती.
फिर्यादी नायकवडी यांनी टप्प्याटप्प्याने मडके याला आरटीजीएसद्वारे सुमारे 34 लाख 50 हजार रुपये पाठवले होते. दरम्यान फिर्यादीने मडके यांना फोन करून परतावाविषयी विचारले असता त्यांनी शेअर मार्केट तेजीत आहे, पैसे वाढतील असे सांगितले. मडके यांनी डिसेंबर 2021 ते मे 2022 पर्यंत 6 लाख 11 हजार रुपये फिर्यादीस परतावादेखील केला.
मात्र, त्यानंतर फोन घेण्याचे टाळणे व उडवाउडवीची उत्तरे देणे असा प्रकार होऊ लागल्यानंतर फिर्यादी यांनी नारायणगाव या ठिकाणी येऊन माहिती घेतली असता आरोपी मडके याने ज्ञानेश्वर म्हातारबा बेल्हेकर यांचे 40 लाख, लक्ष्मण नाथा जोशी यांचे 2 लाख, सुहरीत निर्मल सेन यांचे 1 लाख, शरद मारुती हिले व शशिकला शरद हिले यांचे 2 लाख, संजय छेदीलाल गुप्ता यांचे 2 लाख 50 हजार, पुष्कर संजय गुप्ता यांचे 3 लाख, संगीता संजय गुप्ता 3 लाख, किरण छेदीलाल गुप्ता 3 लाख, अजय छेदीलाल गुप्ता व वैशाली अजय गुप्ता यांचे 3 लाख, मनीषा संतोष महेर यांचे 3 लाख, नीलेश बाळासाहेब मंडलिक यांचे 4 लाख, योगेश बाळासाहेब मंडलिक यांचे 2 लाख, राजू रोहिदास बुचके यांचे 3 लाख असे अनेक लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या पैशावर मिळणार्या परताव्याचे आमिष दाखवून मच्छिंद्र मडके याने फसवणूक केल्याचे उघड झाले. मडके याच्यावर नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील धनवे करीत आहेत.