शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : तहसीलदारांचा आदेश असतानाही स्थानिक शेतकर्यांचा रस्ता थेट जेसीबीने उखडल्याने शिक्रापूर (ता. शिरूर) येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. नितीन खेडकर (वय 38, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. येरवडा कारागृहात असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती पहिलवान मंगलदास बांदल याच्या विरोधात पहिली तक्रार दत्तात्रय मांढरे यांनी केली होती व यानंतर बांदल याला अटक झाली होती.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, स्थानिक शेतकरी नितीन खेडकर यांनी काही दिवसांपूर्वी गावातीलच शेतकरी दिलीप खेडकर यांची शेती विकत घेतली व त्यासाठीचा रस्ता हा चासकमान कालव्याच्या कोरेगाव-धानोरे शाखा कालव्याची वितरिका नं. 3 वरून आहे. मात्र, हा रस्ता शिक्रापूर विकास सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांनी अडविल्याने नितीन खेडकर यांनी शिरूर तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती.
त्यानुसार शिरूर तहसीलदारांच्या आदेशाने स्थानिक मंडलाधिका-यांनी स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात रस्ता खुला करून दिला. त्यानंतर मात्र दोनच दिवसांत दत्तात्रय मांढरे यांनी हा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने पुन्हा खोदला व नितीन खेडकर यांच्यासह स्थानिक शेतक-यांचा रस्ता अडविला. यावरून खेडकर यांनी पुन्हा तहसीलदारांकडे अर्ज केल्याने या रस्त्याचा मंडलाधिका-यांनी पंचनामा केला.
हा संपूर्ण घटनाक्रम सादर करून नितीन ज्ञानेश्वर खेडकर यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार करताच शिक्रापूर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय रावसाहेब मांढरे व बाळासाहेब अण्णासाहेब मांढरे (दोघेही रा. शिक्रापूर) यांच्याविरुद्ध रस्त्याला अडथळा व तहसीलदार आदेश डावलून रस्ता खोदकाम केल्याबद्दल गुन्हे दाखल केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
याप्रकरणी तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बापू हडागळे हे करीत आहेत.