पुणे

तरुणीला खड्ड्यात गाडणार्‍या ‘त्या’ 16 जणांवर गुन्हा दाखल

Laxman Dhenge

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : तोरणागडाच्या पायथ्याला वेल्हेजवळील कोंढावळे खुर्द (ता. राजगड) येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून प्रणाली बबन खोपडे (वय 22) हिला शेतातील खड्ड्यात जिवंत गाडणार्‍या 16 समाजकंटकांविरुद्ध वेल्हे पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. याबाबत दै. 'पुढारी'मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी त्याची दखल घेत तातडीने कार्यवाही सुरू केली.
याप्रकरणी प्रणालीची आई कमल बबन खोपडे (रा. कोंढावळे खुर्द, ता. राजगड) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी संभाजी नथू खोपडे, तानाजी नथू खोपडे (दोघे रा. कोंढावळे खुर्द), बाळू भोरेकर (पूर्ण नाव माहीत नाही, रा. वेल्हे) व उमेश रमेश जयस्वाल (रा. मुंबई) यांच्यासह इतर अनोळखी 12 जण, अशा एकूण 16 जणांवर गुन्हा दाखल केल्याचे ठाणे अंमलदार पकंज मोघे यांनी सांगितले. संभाजी खोपडे आणि इतर समाजकंटक कोंढावळे खुर्द येथील बबन खोपडे यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा (गट क्रमांक 124) बेकायदा ताबा घेण्यासाठी तीन ट्रॅक्टर व जेसीबी घेऊन शेतात शिरले.

या प्रकाराला विरोध करणार्‍या प्रणालीला जेसीबीच्या पटरीने धडक देऊन तिला जमिनीवर पाडले. त्यानंतर ठार मारण्याच्या उद्देशाने तिला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी समाजकंटकांनी प्रणाली, तिची आई आणि बहिणीला दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT