वडगाव फाटा येथे मोटार पेटली ; पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
वडगाव फाटा येथे मोटार पेटली ; पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली 
पुणे

वडगाव फाटा येथे मोटार पेटली ; पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ : पुणे- मुंबई महामार्गावर वडगाव फाटा येथे मुंबईहून आलेल्या एका कारने अचानक पेट घेतला. दरम्यान तेथे कार्यरत असलेल्या वडगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना शुक्रवार (दि.26) रोजी घडली.

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास मुंबईहून राजगुरूनगरकडे चाललेली डस्टर ही चारचाकी गाडी वडगाव फाटा येथे रस्ता ओलांडत असताना त्या गाडीतून धूर येत असल्याचे तिथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ती गाडी थांबवली.

सहाय्यक फौजदार सुनील साळुंखे ट्रॅफिक वार्डन शिवराज ननवरे, विशाल सांगळे, धनंजय हांडे, कुंडलिक सुतार यांनी तातडीने गाडीमधील प्रवाशांना त्यांच्या साहित्यासह बाहेर काढले व क्षणार्धात गाडीने पेट घेतला. धूर निघाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती.

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या व द्रुतगती महामार्गावरील अग्निशामक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशामक दलाने येऊन आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे महामार्गावर व तळेगाव चाकण रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी सतर्कता राखून दुर्घटना टाकणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांचे कौतुक केले.

SCROLL FOR NEXT