राडारोडा  Pudhari
पुणे

400 वर्षांपूर्वीच्या स्मशानभूमीत टाकला राडारोडा

सात समाधी गाडल्या, 1200 झाडांचे मार्किंग, जिवंत झाडेही राडारोड्यात गडप

आशिष देशमुख

पुणे : संगमवाडी नदीपात्राच्या पल्याड चारशे वर्षे दशनाम गोसावी समाजाने जतन केलेली पुरातन स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीवरच बुलडोझर फिरवला गेला. तेथील शेकडो झाडे राडारोड्याखाली गाडली गेली. यात सात समाधी कचर्‍याच्या ढिगार्‍यात गाडल्या गेल्या. याबाबत येथील वारसदारांनी महापालिकेकडे तक्रार केली; मात्र कुणीही लक्ष दिले नाही.

नदीपात्रावरची संपूर्ण जैवविविधता नाहिशी होत आहे. तेथून केवळ पक्षी, झाडे, वन्यजीवांना हटवले जात नाही, तर माणसांसह पुरातन माहात्म्यांच्या समाधीही गाडण्याचा प्रताप महापालिकेने केला आहे. आरटीओ कार्यालयामागे जो घाट आहे, तेथे ही चारशे वर्षांपूर्वीची

स्मशानभूमी आहे. सामाजिक कार्यकर्ते रूपेश केसेकर आणि पर्यावरण अभ्यासक आणि पुणे संवादचे सदस्य चैतन्य केत यांनी ही दुरवस्था दाखवली. वारंवार फोटो, व्हिडीओ काढून महापालिकेला दाखवले; मात्र काहीही उपयोग झाला नाही. ही मंडळी जैवविविधता नष्ट होऊ नये, केवळ याच विषयावर महापालिकेशी भांडत आहेत; मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही.

रात्रीतून टाकला जातो राडारोडा...

या स्मशानभूमीत काळ्या पाषाणापासून हेमाडपंती धर्तीवर बांधलेल्या अनेक समाधी आहेत. या समाजाच्या वारसदार शकुंतलादेवी शंकर गिरी यांनी सांगितले की, इथे दररोज पक्ष्यांची शाळा भरते. पूर्वी सुमारे चारशे ते पाचशे कावळे येत असत. त्यांच्यासोबत शेकडो परजातींचे पक्षी येत; मात्र स्मशानभूमीतील झाडे तोडल्याने शाळेतील पक्ष्यांची संख्या निम्म्याने रोडावली आहे. पक्षी तडफडून मृत पावताहेत. आमच्या पूर्वजांच्या समाधींसह जिवंत झाडांवर महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी रात्रीतून बांधकामाचा राडारोडा आणून टाकला.

आम्ही महापालिका प्रशासनासोबत गेली चार वर्षे भांडत आहोत. त्याचा काही उपयोग झाला नाही. ते एकच कारण सांगतात, की आम्ही कोर्टात केस जिंकलो आहोत. त्यामुळे नदीपात्राचे विस्तारीकरण होणारच; मात्र जैवविविधता नष्ट होताना पाहून काळजाला घरे पडत आहेत. अनेक लोकांनी तक्रारी केल्या; पण त्याचा उपयोग झाला नाही.
रूपेश केसेकर, चैतन्य केत, पर्यावरणप्रेमी नागरिक
दशनाम गोसावी समाजाची ही स्मशानभूमी गे 350 ते 400 वर्षांपासून आहे. आमची सातवी पिढी आहे. माझे आजोबा राजा धनराज गिरी यांनी खूप लक्ष दिले. या ठिकाणी पूर्वजांच्या समाधी आहेत. त्यातील बहुतांश पुरातन आहेत. मात्र, त्यावर राडोरोडा टाकल्याने त्या गाडल्या गेल्या. येथील प्रत्येक झाडाचे मार्किंग केले आहे. आम्ही विरोध केल्याने ती झाडे रात्रीतून तोडली जात आहेत.
शकुंतलादेवी गिरी, वारस, दशनाम गोसावी समाज स्मशानभूमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT