अर्जुन खोपडे
भोर: भोरमधील श्रीरामनवमी उत्सवाला सुमारे 300 वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. सध्याच्या ऐतिहासिक राजवाड्यात गेली 150 वर्षे हा सोहळा साजरा होत आहे. भोरच्या पंतसचिवांचे कुलदैवत श्रीराम आहे. संस्थानचे संस्थापक श्रीमंत शंकराजी नारायण यांचे पुत्र नारोपंत यांना पुरंदर तालुक्यातील बेलसर गावातील अंताजी मोरेश्वर खळदकर यांनी सन 1720 मध्ये श्रीरामाची मूर्ती भोर जवळील ज्या ओढ्याकाठी दिली त्याला रामओढा हे नाव मिळाले.
त्या पूर्वी पंतसचिवांकडे घरगुती श्रीरामनवमी उत्सव साजरा व्हायचा. ही मूर्ती मिळाल्यापासून श्रीरामनवमी उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाले. भोर येथे राजधानी झाल्यावर व विशेषतः हा नवीन राजवाडा बांधल्यावर उत्सवास मोठे स्वरूप आले.
बेलसरच्या अंताजी मोरेश्वर यांनी मूर्ती चैत्र शुद्ध अष्टमीला दिल्यामुळे अष्टमी ते दशमी असे तीन दिवस उत्सव साजरा कराण्याची परंपरा सुरू झाली. राजवाड्याचा सभामंडप झालर, हंड्या, झुमरे, रंगीबेरंगी गोळे यांनी सजवलेला असतो. रात्री रोषणाईमुळे राजवाड्याचा हा चौक खुलून दिसतो.
पूर्वी कचेरीत प्रथम नाच, कीर्तन झाल्यावर भाटाचे कवित्व व्हायचे. उत्सवानिमित्त बाहेरगावाहून शास्त्री, वैदिक, हरदास, पुराणिक, गवई, नर्तकी व आश्रित लोकही हजर असायचे. श्रीरामनवमी हा उत्सवातील महत्त्वाचा दिवस आहे. सकाळी हत्ती, घोडे, स्वार, शिबंदी इत्यादी संस्थानचा समग्र लवाजमा श्रीरामाच्या मूर्ती सोनाराकडून आणण्यासाठी जात असे.
सवाद्य मिरवणूक काढून पालखी राजवाड्यात येते. श्रीरामाची मूर्ती वाड्यात आल्यानंतर विधिवत पूजा अर्चा केली जाते. सभामंडपात राम नामाचा जप सुरू असतो व जन्मकाळाचे वेळी मोठा दरबार भरलेला असतो, कीर्तन सुरू असते. बरोबर बारा वाजता सभामंडपातील पाळण्यात श्रीराम मूर्ती ठेवून पंतसचिवांच्या हस्ते पाळणा हलविला जातो व श्रीरामाचा जन्म उत्सव संपन्न होतो.
श्रीरामाचा जन्म झाल्यावर संस्थानकाळात तोफांची सलामी, बंदुकांची फैर, बँड व ताशावाजंत्री यांचा नाद दुमदुमला जायचा. जन्मकाळानंतर पाळणा हलविण्यापासून इतर धार्मिकविधी श्रीमंतांना स्वतः करीत व शेवटी आरती होते. त्यानंतर सुंठवडा व पानसुपारी होऊन दरबार समाप्त होत असे. पुढील दोन - तीन दिवसांत उत्सवासाठी आलेल्या नर्तकी, कीर्तनकार, भाट, शास्त्री, पुराणिक, कलावंत यांना भोर दरबाराकडून बिदागी देऊन निरोप दिला जायचा.
श्रीरामनवमीच्या कालखंडात फक्त ब्राह्मणांना भोजन व्यवस्था असायची मात्र, सन 1923 पासून त्रयोदशीला ब्राह्मणेत्तर लोकांना भोजन घालण्याची व्यवस्था सुरू झाली. या उत्सवाचे खर्चाकरिता राजगड तालुक्यातील चार व पवनमावळ तालुक्यापैकी चोवीस गावांचे सुमारे बारा हजार रुपये उत्पन्नाची तरतूद करण्यात आली होती. सद्य:स्थितीत रामजन्म उत्सवाची परंपरा पंतसचिवाचे वंशज, समस्त नागरिक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. भोरचा रामजन्मोत्सव हा राज्यातील एक प्रमुख उत्सव समजला जातो.