बारमती: लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार आजअखेर बारामती तालुक्यात 94 हजारांहून अधिक पशुधनांचे लसीकरण करण्यात आले आहे. जनावरांवर लम्पी आजारसदृश्य लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय पोळ यांनी केले आहे.
तालुक्यात एकूण 1 लाख 261 गोवर्गीय पशुधन असून, त्यापैकी 94 हजार 707 इतक्या पशुधनांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित पुशधंनाना लसीकरणाची कार्यवाही सुरू आहे. लम्पी आजाराग्रस्त जनावरांची एकूण संख्या 46 असून उपचारांती बरे झालेली 31 तर 4 जनावरांचा मृत्यू झाला आहे. (Latest Pune News)
तसेच उर्वरित 11 जनावरांवर उपचार सुरू आहेत. दवाखान्यात 20 हजार लसीचा साठा उपलब्ध असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे लसीकरण करण्यासोबतच त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येत आहेत.
स्वच्छता राखा, प्रतिबंधक उपाय करा
निरोगी जनावरांचे लसीकरण, गोठ्यातील स्वच्छता व पाण्याची डबकी असल्यास किटकनाशकांची फवारणी, गोचीड प्रतिबंधक औषधांचा वापर करावा. अधिक माहितीकरिता पशुधन विकास अधिकारी डॉ धनंजय पोळ (9423020053) आणि पशुधन पर्यवेक्षक राहुल हगारे (9767151718) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच लम्पी आजाराबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत असून, पशुपालपालकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
लम्पीबाबत अशी काळजी घ्या
कॅप्री पॉक्स विषाणूपासून गाय, वासरे, बैल गोवर्गीय जनावरांना लम्पी आजाराचा संसर्ग होतो. डास, माशा, गोचीडापासून या आजाराचा प्रसार होतो. आजारी जनावरांच्या अंगावर गाठी, ताप, डोळे व नाकातून स्राव, वजन कमी होणे, दुधात घट अशी लक्षणे आढळून येतात. या कालावधीत जनावरांचे विलिगीकरण करून घ्यावे, त्यांना शुद्ध सकस आहार देण्यात यावा, आजारी जनावरांची विशेष काळजी घ्यावी.