राज्यामध्ये कोरोना काळातील 9 प्रयोगशाळा कार्यरत (File Photo)
पुणे

Pune Corona: राज्यामध्ये कोरोना काळातील 9 प्रयोगशाळा कार्यरत

इतर संसर्गजन्य आजारांच्या तपासणीसाठी निधीची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे: कोरोना महामारीच्या काळात राज्यात तपासणी आणि निदानासाठी तातडीने 34 प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या होत्या. कोरोना आटोक्यात आल्यानंतर तपासण्यांचे प्रमाणही कमी आहे. सध्या केवळ 9 प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

सध्या कार्यरत असलेल्या प्रयोगशाळांमध्ये इतर संसर्गजन्य आजारांचे निदान करण्यासाठी तसेच संशोधनासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही प्रयोगशाळांना सीएसआर निधी मिळाला आहे. तर, काहींना शासनाकडून निधी मिळण्याची प्रतीक्षा आहे. (Latest Pune News)

कोरोना काळात आरटीपीसीआर तपासण्या वाढल्याने तातडीने प्रयोगशाळा उभारण्यात आल्या होत्या. मात्र, महामारी ओसरल्यानंतर या प्रयोगशाळांची उपयुक्तता इतर संसर्गजन्य आजारांमध्ये वापरण्याचा विचार करण्यात आला आहे. डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, स्वाईन फ्लू यांसारख्या आजारांचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळा उपयुक्त ठरू शकतात. त्याचप्रमाणे, कर्करोग निदानासाठीही प्रयोगशाळेतील यंत्रसामग्री वापरता येणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आरोग्य विभागाकडून या प्रयोगशाळा कार्यान्वित ठेवण्यासाठी आणि त्यांचे रूपांतर बहुउद्देशीय निदान केंद्रांमध्ये करण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे. केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाल्यास प्रयोगशाळांमध्ये यंत्रसामग्रीचा पूर्ण क्षमतेने वापर करणे शक्य होणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

प्रयोगशाळा कार्यरत राहाव्यात यासाठी निधीची तातडीने तरतूद करणे गरजेचे असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

कशी होते देखभाल?

  • कोरोना काळात उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळांमध्ये आरटीपीसीआर मशीन, आरएनए एक्स्ट्रॅक्शन युनिट्स, डीपफ्रीझर, बायोसेफ्टी कॅबिनेट्स यांची देखभाल केली जात आहे. प्रत्येक तपासणीनंतर मशीनच्या निर्जंतुकीकरणासाठी विशिष्ट केमिकल्सचा वापर होतो.

  • मशिनचे मोजमाप अचूक राहण्यासाठी ठरावीक कालावधीनंतर तज्ज्ञ तांत्रिक व्यक्तींकडून कॅलिब्रेशन केले जाते. हे सहसा तीन किंवा सहा महिन्यांच्या अंतराने होते.

  • बहुतेक प्रयोगशाळांनी मशीन सप्लाय करणार्‍या कंपन्यांसोबत वार्षिक देखभाल करार (एएनसी) किंवा सर्वसमावेशक करार (सीएमसी) केलेले असतात. त्यामार्फत कंपन्या वेळोवेळी सेवा देतात.

  • मशीन योग्य तापमानात आणि आद्रतेच्या नियंत्रणात ठेवले जातात. एसी आणि ह्यूमिडिफायर यांचे नियमनही या देखभालीचा भाग असतो.

  • मशीन हाताळणारे प्रयोगशाळा कर्मचारी विशेष प्रशिक्षणप्राप्त असतात. चुकीच्या हाताळणीने मशीन बिघडू नये म्हणून मार्गदर्शक तत्वे पाळली जातात.

सध्या राज्यामध्ये 9 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या प्रयोगशाळांमधील यंत्रणा इतर आजारांच्या तपासणी आणि निदानासाठी वापरली जात आहे. यंत्रणेची देखभाल, कुशल मनुष्यबळ आणि निधी, याबाबतचे नियोजन केले जात आहे.
- डॉ. बबिता कमलापूरकर, उपसंचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT