भवानीनगर, पुढारी वृत्तसेवा: श्री छत्रपती कारखान्याच्या या वर्षीच्या लागण हंगामामध्ये 86032 या उसाच्या जातीची लागवड वाढली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 31 जुलैअखेरपर्यंत 86032 व 265 या दोन्ही उसाच्या जातीची मिळून 12 हजार 292 एकर ऊस लागवडीची नोंद झाली आहे. ऊसाच्या 86032 या जातीच्या लागणीकडे शेतकर्यांचा कल वाढू लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या लागण हंगामामध्ये 86032 या उसाच्या जातीच्या लागणीची 2566 एकरने वाढ झाली आहे. यावर्षी श्री छत्रपती कारखान्याने एक जुलैपासून उसाच्या लागणीला परवानगी दिली होती. यामध्ये एक जुलैला 265 या उसाच्या जातीच्या लागणीला परवानगी दिली होती. 15 जुलैपासून 86032 या उसाच्या जातीच्या लागणीला परवानगी दिली होती. यामध्ये 86032 या उसाच्या जातीची 7830 एकर लागण झाली आहे व 265 या उसाच्या जातीची 4461 एकर अशी मिळून 12 हजार 292 एकर 31 जुलैअखेरपर्यंत उसाच्या लागणीची कारखान्याकडे नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी 86032 या उसाच्या जातीची 5264 एकर लागण झाली होती. या वर्षी 7830 एकर लागण झाली आहे त्यामुळे यावर्षी 2566 एकर जादा लागण झाली आहे. परिणामी कारखान्याच्या सरासरी साखर उतार्यामध्येही वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. कारखान्याचा साखर उतारा वाढल्यास ऊस उत्पादक शेतकर्यांचा उसाचा दर वाढण्यासाठी देखील फायदा होणार आहे.
उसाच्या 265 या जातीची गेल्या वर्षी 4872 एकर लागण झाली होती व या वर्षी 4461 एकर लागत झाली आहे. यावर्षी 265 या उसाच्या जातीचे लागणीचे क्षेत्र घटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 411 एकरने 265 या उसाच्या जातीचे लागण क्षेत्र घटले आहे. 265 या उसाच्या जातीपेक्षा 86032 ही उसाची जात जादा साखर उतारा देणारी असल्यामुळे 86032 या उसाच्या जातीच्या लागणीकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे.