प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : केंद्र शासनामार्फत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात जननी सुरक्षा योजना 2005-06 पासून राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ शासकीय आरोग्य संस्थेत अथवा जननी सुरक्षा योजनेकरिता मानांकित करण्यात आलेल्या खासगी आरोग्य संस्थेत प्रसूती झाल्यास दिला जातो. राज्याने जननी सुरक्षा योजनेत चालू वर्षात 85 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
ग्रामीण आणि शहरी भागासाठी लाभ
ग्रामीण भागातील दारिद्य्र- रेषेखालील, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील गर्भवतीची प्रसूती ग्रामीण अथवा शहरी भागात, शासकीय अथवा जननी सुरक्षा योजनेसाठी मानांकित करण्यात आलेल्या खासगी आरोग्य संस्थेत झाल्यास मातेस जननी सुरक्षा योजनेअंतर्गत 700 रुपये याप्रमाणे लाभ देण्यात येतो. शहरी भागातील मातेस 600 रुपये याप्रमाणे लाभ देण्यात येतो, अशी माहिती सहायक संचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिली.
ग्रामीण व शहरी भागातील फक्त दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील गर्भवती मातेची प्रसूती घरी झाल्यास,सदर मातेस जननी सुरक्षा योजनेअंतर्गत 500 रुपये याप्रमाणे लाभ देण्यात येतो. योजनेसाठी मानांकित करण्यात आलेल्या खासगी आरोग्य संस्थेत तातडीची
सिझेरियन शस्त्रक्रिया करणे गरजेचे झाल्यास जास्तीत जास्त 1500 रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येतो. सदरची रक्कम गर्भवती मातेस केलेल्या खर्चाच्या पावत्या सादर केल्यानंतर देण्यात येते.