पुणे: आमच्याकडे एका दिवसात सुमारे 8 ते 10 लाख एचएसआरपीचे (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) उत्पादन करण्याची क्षमता आहे. नागरिकांनी जी अपॉइटमेंट तारीख घेतली आहे, त्या तारखेच्या आत वाहनचालकांना नंबर प्लेट बसवून मिळेल. नागरिकांना वाट पाहावी लागणार नाही, असे एचएसआरपी बनवणार्या कंपनीचे बिझनेस हेड अनुराग चौधरी यांनी सांगितले
शहरात दिलेल्या मुदतीत 25 लाखांपेक्षा अधिक वाहनांना एचएसआरपी बसवण्याचे मोठे आवाहन परिवहन विभाग आणि संबंधित कंपनीसमोर आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांना वेळेत एचएसआरपी मिळाव्यात, याकरिता विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कंपनीने पुण्यात 69 केंद्रे सुरू केली आहेत. याद्वारे एचएसआरपी बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
तसेच, राज्यातील हे काम वेगाने व्हावे, याकरिता शासनाने राज्यभरातील आरटीओ कार्यालयांचे तीन झोनमध्ये वर्गीकरण केले आहे. यातील झोन-1 मध्ये पुणे आरटीओ कार्यालयासह एकूण 12 आरटीओ कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांसाठी रोझमार्टा कंपनीची नेमणूक केली आहे.
वेबसाइट स्लो असल्याच्या तक्रारी
कंपनीच्या प्रतिनिधींना अनेक वितरक, प्रतिनिधी यांनी एचएसआरपीची वेबसाइट स्लो असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. तसेच, पेमेंट करताना पैसे अडकताहेत, याबाबतसुध्दा तक्रारी केल्या आहेत. त्यावर चौधरी यांनी या तक्रारीची दखल घेतल्याचे सांगत या समस्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
झोन-1मधील आरटीओ कार्यालये
1) बोरिवली 2) ठाणे 3) पनवेल 4) कोल्हापूर 5) पुणे 6) नांदेड 7) अमरावती 8) वाशिम 9) यवतमाळ 10) नागपूर (ईस्ट) 11) नागपूर (यू) 12) इचलकरंजी
आम्ही एचएसआरपीसाठी अॅप्लिकेशन केले आहे. मात्र, मार्च 2025 या महिन्यातील अपॉइंटमेंट सिस्टिमवर फुल दाखवत आहेत. तसेच, एप्रिल महिन्याच्या अपॉइटमेंट ओपन होत नाहीत. यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. यासोबतच मोबाईल क्रमांक अपडेट करायची गरज नाही, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. असे असेल तर वाहन संकेतस्थळावर नंबर प्लेटची माहिती (पिन नंबर) अपडेट कशी होणार, शहरातील असंख्य वाहनांचे मोबाईल क्रमांक अपडेट नाहीत. याबाबत तत्काळ तोडगा काढावा.- बापू भावे, खजिनदार, रिक्षा फेडरेशन
एका दिवसात 8 ते 10 लाख नंबर प्लेट तयार करण्याची क्षमता आहे. त्यामुळे नागरिकांना वाट पाहावी लागणार नाही. जी अपॉइंंटमेंट तारीख मिळाली आहे, त्याच्या आत वाहनचालकांना नंबर प्लेट बसवून मिळेल. एचएसआरपी ऑनलाइन बुकिंग करतानाच फिटमेंटचे चार्जेस घेतलेले आहेत, त्यामुळे गाडीला ही नंबर प्लेट बसवताना फिटिंगचे चार्जेस द्यायचे गरज नाही. केंद्रचालकांनीही असे चार्जेस घेऊ नये.- अनुराग चौधरी, बिझनेस हेड, रोझ मार्टा (एचएसआरपी बनवणारी कंपनी)
एचएसआरपीसाठी अॅप्लिकेशन करताना मोबाईल क्रमांक वाहन प्रणालीवर अपडेट लागतो की नाही, अशी अनेक वाहनचालकांची शंका होती. याकरिता मोबाईल क्रमांक वाहनप्रणालीवर अपडेट असण्याची गरज नाही, असे सांगितले. तसेच, त्यांनी नंबर प्लेटवरील स्टीकर मोबाईलवरून स्कॅन होत नसून लेझर कोडवरून वाहनचालकाची माहिती मिळते.श्रीपाद जंगम, रिजनल हेड, रोझ मार्टा (एचएसआरपी बनवणारी कंपनी)