तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील अंदाजित 1600 ते 1700 कुटुंबातील 7 हजार 801 पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी दिली.
केंद्र सरकारमार्फत सामाजिक, आर्थिक आणि जातीय जनगणना 2011 मधील माहितीवर आधारित गरीब व मागास ग्रामीण कुटुंब व निर्देशित व्यावसायिक शहरी कुटुंबाकरिता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी 5 लाख रुपये इतके रकमेचे उपचार शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेचा कार्डधारक देशभरातील कोणत्याही रुग्णालयात 1200 रोगांसाठीचे उपचार कॅशलेस पद्धतीने घेऊ शकतो.
तळेगाव दाभाडे नगर परिषद क्षेत्रातील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी नगर परिषदेत आली आहे. तसेच, लाभार्थ्यांसाठी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
तळेगाव दाभाडे शहरामधील बहुतांश लाभार्थ्यांचे कार्ड आरोग्यमित्र सृष्टी ननावरे व सुनीता राठोड यांच्यामार्फत तयार करण्यात आले. ज्या लाभार्थ्यांचे कार्ड तयार होते, त्यांना उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, अस्थापना विभागाच्या मनीषा चव्हाण, भास्कर वाघमारे, मिळकत विभागाचे जयंत मदने, महिला व बालकल्याण विभागाच्या सुवर्णा काळे यांच्या हस्ते कार्ड वितरण करण्यात आले. उपस्थित लाभार्थ्यांना या योजनेची सविस्तर माहिती एनयूएलएम विभागाच्या शहर अभियान व्यवस्थापक विभा वाणी
यांनी दिली.