पुणे

पुणे : इथे चिमण्या धूळ अन् पाण्याची करतात अंघोळ!

अमृता चौगुले

आशिष देशमुख : 

शहरासह ग्रामीण भागात आता सिमेंटची घरं झाली. माती अन् कुडाची घरं दिसत नाहीत. नेमका हाच अधिवास चिमण्यांना लागतो. तो अधिवासच नष्ट होऊ लागल्याने शहरातून 70 टक्के, तर ग्रामीण भागातून 50 टक्के चिमण्या गायब झाल्यात. शहरात कसबा पेठेत असलेल्या जुने वाडे असणार्‍या भागातच चिमण्यांचा अधिवास उरलाय. शहरात अशी एक हक्काची जागा चिमण्यांना आहे जेथे त्या मनसोक्त खेळतात, बागडतात धूळमातीसह पाण्याने अंघोळही करतात.

वीस मार्च हा जागतिक 'चिमणी दिन' म्हणून जगभर साजरा होतो. त्या दिवशी जगभर पक्षितज्ज्ञ चिमणी कशी जगवता येईल, यावर आता विविध कार्यक्रम घेतात. पुणे शहरात कॅम्प भागात विश्वजित नाईक हे पक्षितज्ज्ञ तरुण राहतात. त्यांच्या बंगल्यात मोठी बाग आहे. तेथे चिमण्यांसह सर्वच पक्ष्यांचा मोठा अधिवास आहे. त्यांच्या बागेतील मातीत चिमण्या आधी धुळीची मग हौदावर पाण्याची अंघोळ करतात.
विश्वजित म्हणाले की, पूर्वी दगड किंवा मातीची घरे होती. त्यामुळे चिमण्यांचा घरात हैदोस असायचा. त्यांना प्रत्येक खोलीतून हाकलावे लागायचे, इतक्या त्या माणसांच्या जवळ असायच्या. आता मात्र सिमेंटची जंगले, मोबाईल टॉवर्समुळे चिमण्यांचा अधिवासच हरवत चाललाय, त्यामुळे चिमण्या माणसांपासून खूप दूर गेल्या आहेत.

त्यांना आवडते धुळीची अंघोळ…
विश्वजित नाईक यांच्या बागेत चिमण्या धुळीची अंघोळ करायला येतात. याचे कारण सांगताना ते म्हणाले, चिमण्यांना सतत माती अंगावर घ्यावीशी वाटते. कारण मातीमुळे त्यांचे तापलेले शरीर थंड होते. उन्हाळ्यात मातीसोबत त्या सतत पाण्याची अंघोळही करतात. सिमेंटच्या जंगलात माती दिसत नाही. सर्वत्र आलिशान टाईल्स दिसतात, त्यामुळे चिमण्या घरात येतच नाहीत.

शहरात चिमणीला वळचणीची जागाच मिळत नाही, त्यामुळे त्या आपल्यापासून दूर गेल्यात. त्या प्रामुख्याने बाभळीच्या झाडावर घरटी बांधत असत. कारण काट्यांमुळे कावळा पोहचत नाही. मात्र, शहरात बाभळी वाढूच दिली जात नाही. त्यामुळे चिमण्यांना हक्काची घरटी बांधायला जागा नाही. चिमण्यांना दाणे नको जागा अन् पाणी द्या, हवी तर लाकडी घरटी लावा. पण शहरात त्यांना अधिवास मिळत नसल्याने त्या कृत्रिम घरटी लावली तरी येत नाहीत.
                                                  – नंदू कुलकर्णी, पर्यावरण अभ्यासक

आम्ही सर्व मिळून वर्षभर पक्ष्यांची ओळख व्हावी, चिमण्यांना घरटी मिळावी म्हणून लहान मुलांसाठी कार्यशाळा घेत असतो. त्यात चिमण्यांचा अधिवास कसा वाढेल, हेच शिकवतो. माझ्या घराच्या बागेत दोनशे घरटी लावली आहेत. त्यात वेस्ट मटेरियलपासून बेस्ट घरटी कशी बनवावी, हे शिकवतो.

                                                           -विश्वजित नाईक, पक्षितज्ज्ञ

 शहरात सिमेंटची घरे आहेत, तेथे माती बघायलाही मिळत नाही. त्यामुळे शहरातून 70 टक्के चिमण्या कमी झाल्या. ग्रामीण भागांतही आता सिमेंटची घरे होत असल्याने चिमण्या आता घरात,अंगणात नाही, तर शिवरातच दिसतात. ग्रामीण भागांतून चिमण्यांचे प्रमाण 50 टक्क्यांनी घटले आहे,
                                           – वैभव जाधव, पक्षी निरीक्षक, निंबगाव केतकी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT