पुणे

पिंपरी शहरात लोकसंख्यानिहाय हवीत 69 लाख झाडे

अमृता चौगुले

पिंपरी : झाडांचे संरक्षण व जतनाबाबत राज्य सरकारच्या 1975 मधील अधिनियमानुसार निश्चित मानांकाचे महापालिकेने उल्लंघन केले असल्याचा आरोप प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, एका व्यक्तीमागे 4 झाडे यानुसार 2011 च्या जनगणनेनुसार शहराच्या एकूण लोकसंख्येच्या चौपट म्हणजे 69 लाखापेक्षा अधिक झाडे शहरात असणे आवश्यक आहे. मात्र, ही बाब कागदावरच राहिली असल्याचेही पाटील यांनी नमूद केले आहे. लागवड केलेल्या झाडांपैकी किती झाडे जिवंत आहेत याबाबतची माहिती ठेवली जात नाही.

प्राधिकरणाकडे प्रभावी नियोजनाचा अभाव

राज्य सरकारच्या झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अनुसार झाडे लावणे व जतन करणे आवश्यक आहे. असे असताना झाडांचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाने प्रभावी नियोजन केलेले नाही. उद्यान विभागाच्या 2018 मधील लेखापरीक्षण अहवालानुसार 3 कोटी 56 लाख इतकी रक्कम आक्षेपाधीन ठेवण्यात आली आहे. म्हणजेच साडेतीन कोटीच्या हिशोबाची कागदपत्रे पालिकेकडे उपलब्ध नाही, हे स्पष्ट होत असल्याचेही पाटील यांनी नमूद केले आहे.

2021 च्या वृक्षगणनेनुसार 32 लाख 16 हजार 799 झाडे

पर्यावरण संरक्षण अधिनियम 1976 प्रमाणे शहरात प्रति व्यक्ती झाडांचे प्रमाण 1:4 असे असावे. 2011 च्या जनगणनेनुसार पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 इतकी नोंदविलेली आहे. त्याच्या चार पट म्हणजेच शहरामध्ये झाडांची एकूण संख्या 69 लाख 10 हजार 768 इतकी असणे अपेक्षित आहे. मात्र, हा आकडा कागदावरच राहिला असल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, महापालिकेच्या डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या वृक्षगणनेनुसार शहरात 32 लाख 16 हजार 799 इतकी झाडे असल्याची नोंद आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT