पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर पोलिस दलासाठी होणारी शिपाईपदाची भरती प्रक्रिया जानेवारी अखेरच्या आठवड्यात होणार आहे. पोलिस शिपाईपदासाठी तब्बल 66 हजार 142 अर्ज आले असून, चालकपदासाठी 6 हजार 843 अर्ज आले आहेत. इतर जिल्ह्यांतील भरती प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे.
मात्र, पुण्यात होणारी जी-20 परिषद, कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम, पोलिस क्रीडा स्पर्धा, 26 जानेवारी पोलिस परेड यासह विविध कार्यक्रमांमुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण असणार आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. शहर पोलिस दलातील 720 शिपाईपदासाठी पुरुष व महिला यांच्यासह तृतीयपंथीय उमेदवारांचे एकूण 66 हजार 142 अर्ज आले आहेत, तर चालकपदासाठी 6 हजार 843 जणांनी अर्ज केले आहेत. चालकपदाची भरती
वेगळी होणार आहे.
लेखी परीक्षा एकाचवेळी
अनेक उमेदवारांनी दोन ठिकाणी शिपाईपदासाठी अर्ज केले आहेत. मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना दोन्ही ठिकाणी वेळ मिळू शकतो. मात्र, मुंबई वगळता बहुतांश जिल्ह्यांतील पोलिस भरतीची लेखीपरीक्षा एकाच दिवशी होण्याचा अंदाज आहे.
तृतीयपंथीयांचे दहा अर्ज
पोलिस शिपाईपदाच्या भरतीसाठी तृतीयपंथीय उमेदवारांचे दहा अर्ज आले आहेत. मात्र, या वर्षीपासून तृतीयपंथीयांसाठी काही जागा राखीव ठेवल्या आहेत. यामुळे तृतीयपंथीना सर्व प्रक्रिया पूर्ण करून भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
720 शिपाईपदासाठी पुरुष व महिला यांच्यासह तृतीयपंथीय उमेदवारांचे एकूण 66 हजार 142 अर्ज आले आहेत. जानेवारी महिन्यात शहरात होणारे कार्यक्रम व बंदोबस्त पाहता, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे.
– रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, पुणे शहर