मिलिंद कांबळे :
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने मिळकतकराची वसुली मोहीम जोरात सुरू आहे. आतापर्यंत गेल्या दहा महिन्यांत तब्बल 600 कोटींची वसुली करण्यात आली आहे. येत्या फेबु्रवारी व मार्च या दोन महिन्यांत 400 कोटींचे टार्गेट या विभागास पूर्ण करण्याचे आव्हान आहे. शहरातील तब्बल 5 लाख 90 हजार मिळकतींची नोंद पालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. त्यात निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र व मोकळ्या जागा अशा मालमत्ता आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षांत 1 एप्रिल 2022 ते 27 जानेवारी 2023 पर्यंत म्हणजे 10 महिन्यांत करसंकलन विभागाने तब्बल 600 कोटींची वसुली केली आहे. चालू वर्षांसाठी करसंकलन विभागाकडे 1 हजार कोटींचे वसुलीचे टार्गेट तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी दिली होते. त्यानुसार, कर संकलन विभागाने वसुली मोहीम तीव्र केली आहे.
येत्या दोन महिन्यांत तब्बल 400 कोटींची वसुली करण्याचे अवघड ध्येय कर संकलन विभागासमोर आहे. शहरातील एकूण 44 हजार 679 थकबाकीदारांना जप्तीपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आतापर्यंत तब्बल 525 मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. जप्तीची नोटीस मिळताच तसेच, जप्तीनंतर अनेक मिळकतधारकांनी बिले जमा केली आहेत. हाउसिंग सोसायटीतील थकबाकीदार सदनिकाधारकांकडून वसुलीसाठी नळजोड खंडित करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. तसेच, थकबाकीदारांची नावे लाऊड स्पीकरवर घोषित केली जात आहे.
थकबाकी भरून कारवाई टाळा
शहरातील मोठ्या थकबाकीदारांकडे मिळकतकर वसुलीसाठी करसंलकन विभागाने तीव्र कारवाई मोहीम हाती घेतली आहे. त्याला थकबाकीदारांचा प्रतिसाद मिळत आहे. नाईलाजास्तव नळजोड खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. जप्तीपूर्व नोटीस मिळकताच थकबाकीदारांनी कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.