पुणे

पुणे शहरातील 60 चौकांचे होणार सुशोभीकरण

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे शहरात 'जी 20' देशांच्या प्रतिनिधींच्या बैठका होणार असल्याने शहरातील प्रमुख 60 चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. हे सुशोभीकरण खासगी बांधकाम व्यावसायिक, संस्थांच्या मदतीने सीएसआरच्या (सामाजिक दायित्व निधी) माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

आर्थिकदृष्ट्या प्रगत 20 देशांचे अर्थमंत्री व त्या देशांच्या केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांची 'जी 20' ही संघटना आहे. या संघटनेची वर्षातून एकदा बैठक होते. तीत हे सर्व मंत्री व गव्हर्नर सहभागी होतात. यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रश्न, सद्यःस्थिती, भविष्यातील वाटचाल, यावर चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेतले जातात. भारत 2023 मधील 'जी 20' परिषदेचा यजमान असून, या परिषदेतील 213 बैठकांपैकी 13 बैठका महाराष्ट्रात होणार आहेत. मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या तीन शहरांमध्ये या बैठका होणार आहेत.

'जी 20' परिषदेच्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारने मुंबई, पुणे व औरंगाबाद महापालिका शहराचे सौंदर्यीकरण व स्वच्छतेसंदर्भात सूचना दिल्या आहेत. या परिषदेसाठी 20 देशांचे 200 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हे प्रतिनिधी शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व इतर पर्यटनस्थळांना भेट देण्याचीही शक्यता आहे. त्यानुसार शहराचे सुशोभीकरण केले जाणार आहे.

या अनुषंगाने बुधवारी पालिकेत अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीस महापालिका आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंते प्रशांत वाघमारे यांच्यासह विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह बांधकाम व्यावसायिक, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यासंदर्भात माहिती देताना विक्रम कुमार म्हणाले की, शहरातील 60 चौकांचे खासगी संस्था, बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून सुशोभीकरणाच्या प्रस्तावाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर करून चौकांचे, पदपथांचे सुशोभीकरण केले जाईल. काही व्यावसायिकांनी त्याबाबतचा आराखडाही सादर केला आहे. काही व्यावसायिक दोन, तीन किंवा पाच चौकांचेही सुशोभीकरण करणार आहेत. सुशोभीकरणाबरोबर त्याचे पुढील चार-पाच वर्षांची देखभाल दुरुस्तीही संबंधित व्यावसायिक करतील. यामध्ये 18 बाय 24 इंच आकारात त्यांना स्वतःचे नाव वापरण्याची मुभा देण्यात आली आहे, असेही विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.

येथे होणार सुशोभीकरण  
नगर रस्ता, येरवडा, विमाननगर, खराडी, विश्रांतवाडी, मुंढवा, हडपसर, वानवडी, फुरसुंगी, कोंढवा, खडी मशिन, स्वारगेट परिसर, कात्रज, नवले पूल, वडगाव चौक, पौड रस्ता, कर्वे रस्ता, बाणेर, सातारा रस्ता, वारजे, धायरी, महंमदवाडी या भागातील 60 चौकांचे सुशोभीकरण केले जाणार आहे.

शहराच्या विकासात विकसकांचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. कोरोनाच्या काळात अनेक विकसकांनी आरोग्य सुविधांसाठी मदत केली होती. आता चौकांच्या सुशोभीकरणाची कामे करून शहरात सौदर्य वृद्धिंगत करण्यास विकसकांचा हातभार लागणार आहे.

                                         – प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता, महापालिका

शहरातील चौकांच्या सुशोभीकरणाच्या कामांचे महापालिकेने विकसकांना आवाहन केले होते. शहराच्या सुशोभीकरणात आपलाही हातभार लागणार असल्याने सर्व विकसकांनी त्यास तत्काळ होकार दिला.

                                                                – अंकुश आसबे, विकसक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT